रेशनवर डल्ला मारणाऱ्या रेशन दुकानदाराविरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी:-सर्वसामान्य ग्राहकांच्या रेशनवर डल्ला मारला जात असल्याचा प्रकार साखरपा कोंडगाव येथे उघडकीला आला आहे. हा प्रकार लॉकडाऊनच्या कालावधीत रेशन न मिळाल्याने उघडकीला आला. या विरोधात ग्राहक रणधीर शिंदे यांनी पुरवठा अधिकारी यांच्याकडे तक्रार केल्यानंतर याची शहानिशा करून रेशन दुकानदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कोरोनाविरोधात लढण्यासाठी सारा देश लाॅकडाऊन आहे. पण या लाॅकडाऊनच्या काळात गरिबांच्या हक्काच्या धान्यावर डल्ला मारला जातोय. असाच धक्कादायक प्रकार संगमेश्वर तालुक्यातील साखरपा कोंडगाव येथील रेशन दुकानावर हा प्रकार उघडकीस आला. रणधीर शिंदे हे या रेशन दुकानावर रेशन खरेदीसाठी गेले. त्यांच्या रेशन कार्डवर सहा व्यक्तींची नोंद आहे. प्रत्यक्षात ६ व्यक्तींच्या नावावर धान्य देण्याऐवजी केवळ दोन व्यक्तींचेच धान्य त्यांना देण्यात आले. मात्र शिंदे यांना केवळ ६ किलो गहु आणि ४ किलो तांदूळ या रेशन दुकानातून देण्यात आले. आँक्टोबर २०१९ ते एप्रिल २०२० पर्यत हा सारा प्रकार सुरु होता. म्हणजे रेशन दुकानदारांनी तब्बल ८४ किलो तांदुळ,५६ किलो गहु, तीन किलो तुरडाळ आणि चार किलो चणाडाळ कमी दिली.  लाॅक डाऊनच्या काळात प्रतिव्यक्ती धान्य देण्याच्या योजनेतून धान्य मिळाले नाही म्हणुन शिंदे यांनी तक्रार केली. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेत रेशन दुकानदार मधुकर माने यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. जीवानावश्यक वस्तू कायदा कलम ३ आणि ७ प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.