रस्ते बंद केल्याची करा तक्रार; होणार कारवाई

रत्नागिरी:- कोरोनाचा मुंबई, पुण्यात मोठ्या प्रमाणावर फैलाव सुरू आहे. या शहरात संचारबंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू झाल्याने अनेक चाकरमान्यानी शक्य होईल तसा गावचा रस्ता धरला. पण चाकरमानी गावात परतू लागल्याने गावकरी धास्तावले. अनेकांनी गावचा रस्ता बंद केला. परंतु अशा प्रकारे कुणीही रस्ता बंद करू शकत नाही. याबाबत तक्रार करा आम्ही कारवाई करू असा इशारा जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिला. मुंबई आणि पुण्यासारख्या मोठया शहरात कोरोनाचा वेगाने फैलाव होत आहे. या शहरांमध्ये कोरोनाने मृत्यू होणाऱ्याची संख्या देखील वाढत आहे. या भीतीने मुंबई, पुण्यातील चाकरमान्यानी घरचा रस्ता धरला आहे. मिळेल त्या गाडीने अगदी चालत हजारो चाकरमानी कोकणात दाखल होत आहेत. परंतु हे चाकरमानी गावात कोरोना घेऊन येऊ शकतात या भीतीने अनेक गावांनी आपल्या सीमा बंद केल्या आहेत. गावात यायला आणि गावातून बाहेर पडायला बंदी घालण्यात आली आहे.  परंतु अशा पद्धतीने गावबंदी केल्याने अनेकांना त्रास होत आहे. याबाबतचा प्रश्न जिल्हा पोलिस अधीक्षकांना विचारण्यात आला. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मुंढे यांनी अशा प्रकारे गावबंदी करण्याचा कुणाला अधिकार नसल्याचे सांगितले. अत्यावश्यक सेवा सुरू रहायलाच हव्यात. अशा प्रकारे जर कुणी रस्ता बंद केला असेल तर नागरिकांनी 100 नंबर किंवा 222222 या क्रमांकावर फोन करून तक्रार करा पोलीस प्रशासन या तक्रारीची योग्य दखल घेईल असे पोलीस अधीक्षक डॉ. मुंढे यांनी सांगितले.