दिलासा! 103 पैकी 43 संशयितांचे स्वॅब अहवाल निगेटिव्ह

रत्नागिरी:-रत्नागिरीकरांसाठी दिलासादायक बातमी असून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ४३ व्यक्तींचे स्वॅब अहवाल निगेटिव्ह आले असून त्यामध्ये ३ डॉक्टरांसह जिल्हा रुग्णालयातील कर्मचार्‍यांचा समावेश आहे.
पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व त्यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांचे नमुने तपासणीसाठी पाठविले होेते. तब्बल १०३ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित होते. त्यापैकी रविवारी रात्री उशीरा ४३ अहवाल जिल्हा रुग्णालयाला प्राप्त झाले आहेत. ते सर्व ४३ अहवाल निगेटिव्ह आले असून त्यामध्ये संपर्कात आलेल्या ३ डॉक्टरांचा समावेश आहे. तर जिल्हा रुग्णालयातील कर्मचार्‍यांचा देखील समावेश आहे. अद्यापही ६७ अहवाल प्रलंबित असून हे अहवाल सोमवारी रात्री उशीरापर्यंत येण्याची शक्यता जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांनी वर्तविली आहे.
दरम्यान एकावेळी ४३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने ही दिलासादायक बातमी ठरली आहे. अवघ्या रत्नागिरीत ३ रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यामुळे रत्नागिरी डेंजर झोनमध्ये जाणार की काय अशी भीती निर्माण झाली होती. मात्र कोरोनाचे सावट आता दूर होण्यास सुरुवात झाली आहे.
ज्या ३ रुग्णांच्या संपर्कात त्यांचे नातेवाईक, मित्रपरिवार आणि उपचार करणारे डॉक्टर्स ही मंडळी आली होती अशा सर्वांना क्वारंटाईन केले होते. त्यामध्ये खाजगी डॉक्टरांचा देखील समावेश होता. डॉक्टरच क्वारंटाईन झाल्याने अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा उठला होता.
रविवारी रात्री प्राप्त झालेल्या अहवालामुळे ही भीती दूर झाली आहे. ४३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून त्यामध्ये ३ डॉक्टर्स आहेत. ३ डॉक्टरपैकी १ जिल्हा रुग्णाल्यातील डॉक्टर असून रुग्णालयातील कर्मचार्‍यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. दरम्यान अन्य एका डॉक्टरचा अहवाल अद्यापही प्रलंबित आहे. त्या अहवालाची प्रतिक्षा रुग्णालयाला लागली आहे.