जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी कोकण रेल्वेचा पुढाकार

रत्नागिरी:-कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्वत्र लोकडाऊन सुरु असताना कोकण रेल्वेच्या मार्गावर मात्र २४ तास अत्यावश्यक सेवेअंतर्गत मालगाडीच्या माध्यमातून वाहतूक सेवा सुरु आहे.रेल्वेच्या माध्यमातून कोकणातील जिल्ह्यांसह देशाच्या दक्षिणेकडील भागांना जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा करण्यात कोकण रेल्वेने महत्वाची भूमिका बजावली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व ती आवश्यक खबरदारी घेत रेल्वे मार्गावर कोकण रेल्वे कर्मचारी देश हिताचे काम करत आहेत.        

देशभर लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीत रेल्वे महत्वाची भूमिका बजावत आहेत. कोकण रेल्वेच्या मार्गावरही लाॅकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून मालगाडीच्या माध्यमातून हि वाहतुक केली जातेय. यामुळे कोकणासह दक्षिणेकडील राज्यांना याचा फायदा होतो आहे. आरोग्य विभाग,पोलीस यांच्याप्रमाणेच सेवा देणाऱ्या कोकण रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाकडून विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या माल वाहतुकीच्या नियमनाकरिता कार्यालयात पाच टक्के तर ट्रॅक दुरुस्ती व देखभाल यासाठी केवळ पंचवीस टक्के इतका कमीत कमी आवश्यक असणारा कर्मचारी वर्ग क्रमाक्रमाने बोलाविण्यात येत आहे. सर्व कर्मचाऱ्याना, मास्क, सॅनिटीझर, साबण, नॅपकिन या सारख्या वस्तू उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तर महिला कर्मचारी वर्गाला या अत्यावश्यक सेवेतून वगळण्यात आले आहे .         

कोकण रेल्वेच्या मार्गावर नियमित कर्मचाऱ्यांबरोबरच खाजगी कंत्राटदारांचे कामगार हि काम करतात. या सगळ्या कामगारांची विशेष काळजी घेतली जात आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना देखील आवश्यक असणारे सॅनिटीझर्स, संरक्षक मुखवटे, साबण तसेच आवश्यकता असेल त्याप्रमाणे अन्नधान्याचा पुरवठा, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता यांची देखील सोय करण्यात आली आहे. कंत्राटी कामगार व परराज्यांमधून आलेले इतर कामगार यांच्यावर  श्रमिक कल्याण मंत्रालय अधिकारी यांच्या कडून देखील देखरेख ठेवली जाते आहे. अशा कामगारांच्या कल्याणार्थ केलेल्या कामाची सविस्तर माहिती कोकण रेल्वेतर्फे श्रमिक कल्याण मंत्रालयास नियमितपणे सादर केली जाते. याच कल्याणकारी योजनांचा भाग म्हणून या  काळात जरी काम पूर्ण वेळ होत नसले तरीही सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्यांचा पूर्ण पगार देण्याची व्यवस्था करण्याचे आदेश संबंधित कंत्राटदारांना दिले गेले  आहेत.         

लाॅकडाऊनच्या काळात कोकणरेल्वेच्या मार्गावर न टाळता येण्यासारखी मार्गाच्या देखभालीची कामे सुरु आहेत. ज्याचा फायदा आताच्या माल वाहतुकीबरोबरच येणाऱ्या मान्सून सिझन करता होणार आहे. गतवर्षी मुसळधार पावसाने देशभरातील रेल्वे व्यवस्था विस्कळीत झाली होती  त्यावेळीहि कोकण रेल्वेला पावसात अखंडित सेवा देता आली होती. यावेळीही अशीच सेवा देता यावी या करीता रेल्वे प्रशासन सर्व खबरदारी घेत प्रतिदिन २५ टक्के कामगारातून मार्ग देखभालीची कामे करते आहे. या राष्ट्रीय संकटाच्या काळात कोकण रेल्वे कर्मचारी देशातील वहातुक यंत्रणा सुसज्ज रहावी यासाठी कोकण रेल्वेच्या मार्गावर मेहनत घेताना दिसत आहे.