जिल्ह्याची तीन झोनमध्ये विभागणी होणार

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्याचा ऑरेंज झोनमध्ये समावेश झाला असला तरी या झोनमध्ये कोणते उद्योग व्यवसाय सुरू करायचे याबाबत कोणत्याच मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. मात्र रत्नागिरी जिल्ह्याची देखील तीन झोनमध्ये विभागणी करण्यात येणार आहे. कुठल्या भागाला रेड झोन, ग्रीन झोन आणि ऑरेंज झोन मध्ये घ्यायचा याबाबत अभ्यास सुरू आहे. लवकरच जिल्ह्याची तीन झोन मध्ये विभागणी करण्यात येईल असे जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

 सोमवारी उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी कोरोनासंदर्भात आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, आमदार राजन साळवी यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, मुख्यकार्यकारी अधिकारी श्री. बघाटे आदी उपस्थित होते.

रत्नागिरी जिल्ह्यात सध्या 3 पॉझिटीव्ह रूग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यस्तरावर आपण यलो झोनध्ये आहोत तरी शासनाकडून गाईडलाईन आल्यावरच पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. तोपर्यंत कोणताही निर्णय घेतला जाणार नाही. रत्नागिरी जिल्ह्यात मात्र कोरोना संख्येनुसार तीन झोन तयार करण्यात येणार आहे. याचा अहवाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून यासंदर्भात सर्व निर्णय जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा घेणार आहेत.

जिल्ह्यातील शेती व मत्स्य व्यवसायावरील निर्बंध उठविण्यात आले तरी सोशल डिस्टन्सची अंमलबजावणी काटेकोरपणे होणे गरजेचे आहे. यासंदर्भातही आपण योग्य ती खबरदारी घेवून गाईडलाईन लवकरच जाहीर करणार असल्याची माहिती यावेळी जिल्हाधिकारी मिश्रा यांनी दिली. मच्छीमार्केटदेखील सुरू होणार असून याठिकाणी पोलीसांचा कडक वॉच राहणार आहे.शासनाच्या गाईडलाईननुसार याचा निर्णय लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचेही मिश्रा यांनी सांगितले.

या बैठकीवेळी श्री भैरी देवस्थानकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1 लाख रूपये प्रशासनाकडे देण्यात आले. तसेच जे.एस.डब्ल्यू. जिंदल पोर्ट कंपनीकडून जिल्हा रुग्णालयाला 4 व्हेंटीलेटर देण्यात आले असून यामुळे रुग्णालयाला मदत होणार असल्याचेही मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.