आंबा खरेदीसाठी ऑनलाईन मार्केट; पणनचा पुढाकार 

रत्नागिरी:-कोकणातील हापूसला ग्राहक आणि योग्य दर मिळवून देण्यासाठी पणन मंडळाने शेतकरी आणि खरेदीदार यांची नोंदणी सुरु केली आहे. पुण्यात आंबा ठेवण्यासाठी वखार महामंडळाने गोदाम बागायतदारांसाठी उपलब्ध करुन दिले असून वाहतुकीची सोय त्यात आहे. या माध्यमातून दर्जेदार आंब्याला चांगला कोकणातील बागायतदारांना मिळू शकेल.
हापूस आंबा उत्पादकांकडून थेट खरेदीची व्यवस्था कृषी पणन मंडळाच्या संकेतस्थळावर करण्यात आली आहे. हापूस हा महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील खवय्यांची रसना तृप्त करतो. त्यामुळे ग्राहक आतुरतेने हापूस आंब्याची वाट पहात असतात. कृषी पणन मंडळामार्फत दरवर्षी कोकणातील हापूस आंबा शहरातील ग्राहकांना थेट कोकणातील उत्पादकाद्वारे उपलब्ध व्हावा यासाठी आंबा महोत्सवाचे आयोजन केले जाते. यावर्षी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचे पार्श्वभूमीवर आंबा महोत्सव आयोजन करणे अशक्य आहे. कोकणातील आंबा उत्पादकांना विक्रीसाठी शहरात यावे लागू नये, अशी व्यवस्था केली आहे. शहरातील ग्राहकांना ही घरा बाहेर किंवा सोसायटी बाहेर पडावे लागू नये यासाठी उत्पादक ते ग्राहक या दोघांनीही ऑनलाइन पोर्टलव्दारे आंबा खरेदी-विक्री करण्यात येणार आहे. पुणे, मुंबई तसेच इतर शहरातील वैयक्तिक ग्राहक अथवा सहकारी गृहनिर्माण संस्था इत्यादी सर्वाना त्याची मागणी त्या पोर्टलवर नोंदविता येईल. त्याद्वारे विशिष्ट आंबा उत्पादकांशी संपर्क करता येऊ शकेल आणि आंबा खरेदी करता येईल.
कृषी पणन मंडळाने कोकणातील आंबा उत्पादकांच्या सोयीसाठी गुलटेकडी येथील वखार महामंडळाचे गोदाम तात्पुरते साठवणूकीसाठी उपलब्ध केले आहे. आंबा खरेदी करिता किमान मर्यादा 100 डझन असेल. तसेच आंबा थेट सोसायटीत पोहोच करता यावा, याकरिता वाहन व्यवस्थाही केली आहे. त्यामुळे कृषी पणन मंडळाकडून कोकणातील दर्जेदार व नैसर्गिकरित्या पिकविलेला हापूस आंबा शहरातील ग्राहकांना थेट उत्पादकांकडून उपलब्ध व्हावा यासाठी ग्राहकांनी कृषी पणन मंडळाचे पोर्टलवरील माहितीव्दारे खरेदीदार म्हणून नोंदणी केल्यानंतर आपली मागणी नोंदवावी अथवा आंबा उत्पादकांशी संपर्क करून खरेदीसाठी मागणी नोंदवावी असे आवाहन कृषी पणन मंडळामार्फत करण्यात येत आहे.

राज्य कृषी पणन मंडळाच्या www.msamb.com  या संकेतस्थळावरील buyer, sellar, information लिंकव्दारे अथवा bs.msamb.com या लिंकव्दारे खरेदीदाराना नोंदणीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. कृषी पणन मंडळाने त्या पोर्टलवर कोकणातील देवगड व रत्नागिरी हापूस आंबा उत्पादकांची नोंदणी सरू केली आहे. त्यात आंबा उत्पादकांचे नाव, संपर्क क्रमांक, कोणत्या प्रजातीचा आंबा उपलब्ध आहे आदी तपशील पोर्टलवर उपलब्ध असेल.