103 जणांच्या स्वॅब अहवालाची प्रतीक्षा

रत्नागिरी:- जिल्हा रुग्णालयात तीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. सध्या जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात असल्यामुळे प्रशासनाने निःश्‍वास सोडला आहे. रविवारी (ता. 12) जिल्हा शासकीय रुग्णालयात सात नवीन संशयितांना दाखल केले तर दोन जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 9 ते 11 एप्रिल या कालावधीत विविध गावांमधून आणलेल्या 103 संशयित रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी मिरज प्रयोगशाळेत पाठविले आहेत.
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. आतापर्यंत 103 लोकांचे स्वॅब तपासण्यासाठी घेण्यात आले आहेत. शनिवारी पाठविलेल्या नमुन्यांपैकी साखरतर येथील 14 नमुने निगेटीव्ह आले आहेत. खेडमधील तीन नमुने तपासणीसाठी पुन्हा मागविण्यात आले आहेत.
जिल्ह्यात संस्थात्मक क्वारंटाईन असलेल्यांची संख्या 302 इतकी आहे. त्यातील जिल्हा रुग्णालयात 62, कामथे 2, कळंबणी 27, गुहागर रुग्णालय 2, मंडणगड ग्रामीण रुग्णालय 1, संगमेश्वर ग्रामीण रुग्णालय 2 रुग्ण आहेत. उर्वरित रुग्ण त्या-त्या तहसिलदार कार्यालयांमार्फत केलेल्या निवासाच्या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत. 
परप्रांतातून आलेल्या आणि जिल्ह्यात थांबलेल्या व्यक्तींसाठी जिल्हयात 54 निवारागृहे सुरु करण्यात आली आहेत. जिल्हयात विविध ठिकाणी असलेल्या 2456 जणांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
कोरोना रुग्णसंख्येनुसार तीन झोनमध्ये विभागणी करुन तिथे परिस्थितीनुसार शिथिलता देण्याची तयारी केली आहे. तसे आदेश अद्यापही जिल्हास्तरावर प्राप्त झालेले नाहीत, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यात पाच पॉझिटीव्ह रुग्ण आढळले होते. त्यातील एकाला बरा होऊन घरी सोडण्यात आले तर एकाचा मृत्यू झाला. तीन रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्णसंख्येच्या आधारे रत्नागिरी जिल्हा ऑरेंज झोनमध्ये येऊ शकतो. हे सध्या शासनस्तरावर विचाराधीन आहे.