बागेतील आंबा थेट ग्राहकांच्या घरी; पणन मंडळाचा पुढाकार

रत्नागिरी:-

बाजार समित्या बंद होत असल्या तरीही आंबा बागायतदारांना दिलासा देण्यासाठी कृषी व पणन विभाग वेगवेगळी क्लुप्ती वापरत आहेत. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लोकांशी संवादातून ग्राहक मिळवून दिले. मुंबई, ठाणे महापालिकेने आंबा खरेदी करायचा असेल तर या नंबरवर पत्र पाठवा, असे आवाहन वेबसाईट, व्हॉटस्‌ऍप, ट्‌वीटरवर केले आहे. त्याद्वारे गेल्या दोन दिवसात पनवेल, पालघर, कर्जतमध्ये पाच हजार बॉक्‍सची विक्री झाली.

बागायतदार ते थेट ग्राहक अशी संकल्पना कृषी विभागाने राबवली. रत्नागिरी, राजापूर येथील बागायतदारांनी याचा फायदा उठवला. सातारा, कऱ्हाड, बारामतीपर्यंत आंबे पोचले. मुंबई, पुण्यात लॉकडाऊनमुळे आंबा विक्री अशक्‍य आहे. मोठमोठ्या गृहनिर्माण सोसायटीत परजिल्ह्यातील लोकांना प्रवेशास मनाई आहे. त्यासाठी कृषी कर्मचाऱ्यांनी सोसायटींशी चर्चा करुन आंबा विक्रीची साखळी तयार केली. किमान 100 बॉक्‍सची मागणी असेल त्यांना प्राधान्य आहे. डझनचा दर साडेतीन हजार आहे.

मुंबई, ठाण्यातील ग्राहकासाठी तेथील महापालिकांना विनंती केली होती. तसे पत्र कृषी विभागाचे कृषी संचालक विकास पाटील यांनी ट्‌वीटरद्वारे मोठ्या गृहनिर्माण सोसायटींना पाठवले होते. त्यावर आंबा बागायतदारांचा मोबाईल नंबर होता. शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात ग्राहकांकडून आधी पैसे भरले गेले की, त्वरित बॉक्‍स पाठविण्यात येत आहेत.