कोरोनाला हरवण्यासाठी रत्नागिरी पोलिसांची शायरीतून साद

रत्नागिरी:-
‘बेवजह घरसे निकलनेकी जरूरत क्या है, मौत से आँख मिलानेकी जरूरत क्या है, सबको मालूम है बाहर की हवा है कातिल, युंही कातिल से उलझने की जरूरत क्या है’…. ही शायरी किंवा गझल कुठल्या कार्यक्रमात सादर केली गेली नसून रत्नागिरी पोलिसांनी नागरिकांना केलेले आवाहन आहे. घरी रहा आणि सुरक्षित रहा असे आवाहन पोलिसांनी थेट शायरीतून केले.
रत्नागिरीत कोरोना हळूहळू हातपाय पसरत आहे. गुहागर मधील शृंगारतळी येथे पहिला रुग्ण सापडला. यानंतर राजीवडा येथे एक तर साखरतर मध्ये 2 रुग्ण सापडले. खेड मधील कोरोना बाधित रुग्णाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात 5 कोरोनाचे रुग्ण सापडल्या नंतर प्रशासन सजग झाले आहे. कोरोनाचे रुग्ण सापडलेले भाग आयसोलेटेड करण्यात आले आहे. या भागातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे तर कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्याना 14 दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात येत आहे.
कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन विविध उपक्रम हाती घेत आहे. लोकांनी घरीच थांबावे यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन करण्यात येत आहे. रत्नागिरी शहरातील दोन्ही कंटेनमेंट झोन वर ड्रोनच्या सहाय्याने पाहणी केली जात आहे.
याशिवाय आता लोकांनी घरीच थांबावे म्हणून पोलिसांनी आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे. शायरीच्या माध्यमातून लोकांना आवाहन केले जात आहे. शहरातील राजीवडा, साखरतर, उद्यमनगर यासह इतर भागात पोलिसांकडून लोकांनी घरीच थांबून कोरोनाला हरवावे यासाठी आता शायरीच्या माध्यमातून जनजागृती सुरू आहे.