केंद्र सरकारचा हिरवा कंदील; मासेमारी बंदरांवर लगबग वाढली

रत्नागिरी:-केंद्र शासनाने मासेमारीला हिरवा कंदील दिल्यानंतर जिल्ह्यातील मासेमारी बंदरांवरील लगबग वाढली आहे. परंतू याबाबतच्या गाईडलाईन्स अद्याप प्राप्त झाली नसल्याने या निर्णयाची अंमलबजावणी कधी पासून होणार याबाबत प्रश्नचिन्ह आहे. सोशल डिस्टंन्सिंग ठेवतच बंदरांवर कामकाज चालणार असून मासेमारी बाबत सहाय्यक मत्स्य विभागाने शासनाकडे मार्गदर्शन मागविले असल्याची माहिती सहाय्यक मत्स्य आयुक्त कार्यालयाकडून दिली आहे.कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर सर्व व्यवहार बंद झाले. केंद्र आणि राज्य सरकारने धोका टाळण्यासाठी मच्छीमारी, त्याची विक्री आदींवर बंधने आणली होती. लॉकडाऊनच्या काळात मासे पकडणे, त्याची विक्री, प्रक्रिया, वाहतूक आदींना सरकारने परवानगी दिली आहे. यासंदर्भातील एक पत्र केंद्राने सर्व राज्य सरकार आणि केंद्र शासित प्रदेशांना पाठवले आहे. त्यानुसार लॉकडाऊनच्या काळात मासेमारीसह सर्व गोष्टी करण्यास परवानगी दिली आहे. लॉकडाऊनच्या काळात बीज निर्मितीवर बंदी घातली होती. त्यामुळे मच्छीमारांना दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊनमुळे मासे खाण्यास न मिळालेल्या खवय्यांना बाजारपेठेत मासे मिळतील. शासनाने परवानगी दिली असली तरी यासंदर्भात सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. मासे विक्री करताना या नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई करावी अशी सुचना केंद्राने दिली आहे.
केंद्राच्या सुचना प्राप्त झाल्या असल्या तरीही त्याची अंमलबजावणी कशी करावी याविषयी राज्य शासनाकडून जिल्ह्यातील सहाय्यक मत्स्य कार्यालयांना सुचना प्राप्त झालेल्या नाहीत. त्याची प्रतिक्षा असल्यामुळे मासेमारी सुरु करण्यासाठी थांबावे लागणार आहे. कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी शासनाने छोट्या मच्छीमारांना बंधने घातलेली नव्हती. मत्स्य प्रक्रिया उद्योग बंद ठेवल्यामुळे मच्छीमारीही ठप्प होती. जिल्ह्यात मिरकरवाडा, हर्णे येथील बंदरातून कोट्यावधींची उलाढाल होते. कोरोनामुळे सुमारे आठशे कोटीची उलाढाल ठप्प झाली. पुन्हा बंदरावरील लगबग सुरु होणार आहे. त्यादृष्टीने काही मच्छीमार तयारीला लागले आहेत. इंधन, पाणी आणि बर्फ भरुन नौका सज्ज ठेवण्यात येत आहेत. त्यामुळे मिरकरवाडा बंदरात तुरळक गर्दी आहे.