रत्नागिरी:- संचारबंदीच्या काळात विनाकारण फिरणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक पोलीस कारवाई करीत आहेत. आता या कारवाईतून सरकारी बाबू देखील सुटलेले नाहीत. विनाकारण गाडी बाहेर काढणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या गाड्या देखील वाहतूक पोलिसांनी जप्त केल्या आहेत. रत्नागिरी शहरात संचारबंदीची काटेकोरपणे अमलबजावणी व्हावी यासाठी वाहतूक पोलीस झटत आहेत. संचारबंदी काळातही विनाकारण दुचाकी घेऊन घराबाहेर पडणाऱ्याची संख्या मोठी आहे. अशांना आवर घालण्यासाठी सुरुवातीला काठीचा वापर करण्यात आला. यानंतर मोठा दंड देखील ठोठावण्यात आला. यानंतरही लोक ऐकत नसल्याने दुचाकीमधील हवा काढण्यात आली. परंतु लोक विनाकारण गाड्या घेऊन रस्त्यावर उतरत असल्याने गाड्या ताब्यात घेण्याची मोहीम हाती घेण्यात आली. विनाकारण दुचाकी आणि चारचाकी गाडी घेऊन बाहेर पडणाऱ्याच्या गाड्या ताब्यात घेण्यात येत आहेत. यामधून शासकीय कर्मचाऱ्यांची देखील सुटका झालेली नाही. शासकीय कामाच्या नावावर अनावश्यक फिरणाऱ्या ४ कर्मचाऱ्यांची वाहने देखील जप्त करण्यात आली आहेत. संचारबंदीच्या नियमांचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहन वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी केले आहे.