शिरगाव, भाट्ये परिसरातून 75 जण क्वारंटाईन

रत्नागिरी:-दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या व्यक्तींच्या संपर्कात आल्याच्या संशयावरुन शिरगांव व भाट्ये परिसरातील सुमारे ७५ व्यक्तींना शुक्रवारी रात्री आरोग्य विभागाने ताब्यात घेतले आहे. या सर्वांचे स्वॅब तपासणीसाठी मिरज येथे पाठविले आहेत. या सर्व व्यक्तींना जिल्हा रुग्णालयात क्वारंटाईन केले आहे. 

   रत्नागिरीत राजीवडा पाठोपाठ साखरतर येथील २ महिला पॉझिटिव्ह आढळल्यानंतर जमातीसाठी आलेल्या कोणा कोणाच्या संपर्कात आल्या होत्या त्याची माहिती घेण्याचे काम सुरु झाले आहे. तसेच दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या व्यक्तींच्या संपर्कात येथील काही लोक आल्याच्या संशयावरुन अशा व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची एक यादी तयार केली होती.

त्यानुसार शुक्रवारी रत्नागिरीत तब्बल ७५ संशयितांना ताब्यात घेतले आहे. या सर्वांना जिल्हा रुग्णालयात आणून सर्वांचे स्वॅब मिरज येथे तपासणीसाठी पाठविले आहेत. या सर्व व्यक्तींना सध्या जिल्हा रुग्णालयात क्वारंटाईन केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार शिरगाव परिसरातून एकूण ६० व्यक्तींना शुक्रवारी रात्री पोलिसांच्या मदतीने आरोग्य विभागाने ताब्यात घेतल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच उर्वरीत १५ संशयित हे भाट्ये परिसरातील ताब्यात घेतल्याचे समजते. या व्यक्ती दिल्लीतील कार्यक्रमात सहभागी झालेल्या व्यक्तींच्या संपर्कात आल्या होत्या. तसेच जमातीसाठी आलेल्या व्यक्तींच्या संपर्कात होत्या असा संशय असल्याने त्यांना ताब्यात घेतल्याचे समजते. 

जिल्हा रुग्णालयात सध्या २५ रुग्ण हे इन्स्टिट्यूट क्वारंटाईन आहेत. त्यातील ३ रुग्ण हे पॉझिटिव्ह असून पॉझिटिव्ह रुग्णांना वेगळ्या ठिकाणी आयसोलेट केले आहे. तर शुक्रवारी पाठविलेल्या ८ नमुन्यांचे अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत. तसेच संपर्कात आलेल्या व्यक्तींची संख्या ही वाढण्याची शक्यता असून माहिती संकलीत करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. कोरोना बाधीत क्षेत्रातील आरोग्य विभागाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.

राजीवडा आणि साखरतर येथे कोरोना बाधीत रुग्ण सापडले आहेत. या ठिकाणी ३ कि. मी. परिसरात २२ हजार लोकांचे आरोग्य सर्वेक्षण पूर्ण केले आहे. तर लॉकडाऊनचे पालन काटेकोरपणे व्हावे यासाठी दोन्ही ठिकाणी ‘ड्रोण’च्या माध्यमातून लक्ष ठेवले जात आहे.