शिमग्याला आलेले हजारो चाकरमानी गावातच ‘लाॅकडाऊन’

गावच्या रेशन दुकानांवर चाकरमान्यांना धान्य द्यावे;आ.शेखर निकम यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

चिपळूण:-
मुंबई-पुण्यातून हजारो चाकरमानी शिमगोत्सवासाठी कोकणात आले होते, परंतु कर्फ्यू आणि त्यानंतर जाहीर झालेल्या लाॅकडाऊनमुळे  चिपळूण- संगमेश्‍वर तालुक्‍यात सुमारे तीस ते पस्तीस हजार चाकरमानी म्हणजे १० ते १२ हजार कुटुंबे गावाकडे अडकली आहेत. गेले पंधरा-वीस दिवस हे चाकरमानी आपल्या कुटुंबासह गावातच अडकल्याने त्यांची अडचण निर्माण झाली आहे. चिपळूण, संगमेश्वरप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यातील अन्य तालुक्यातही अशीच परिस्थिती आहे. या चाकरमान्यांची रेशन कार्ड मुंबई, पुणे या ठिकाणी असल्याने त्यांना गावाकडे रेशन दुकानांमध्ये अन्नधान्य मिळत नाही. तरी त्यांच्या मुंबई-पुणे येथील रेशनिंग कार्डची माहिती संबंधित ऑनलाइन पोर्टलद्वारे घेऊन त्यांना लाॅकडाऊन कालावधीत गावाच्या ठिकाणी अन्नधान्य पुरवठा होणे आवश्यक आहे. याबाबत योग्य तो निर्णय घेऊन संबंधित विभागाला तसे आदेश द्यावेत, अशी मागणी चिपळूण- संगमेश्वर मतदार संघाचे आमदार शेखर निकम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.