दिलासादायक; 42 जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह 

रत्नागिरी:-रत्नागिरीकरांसाठी दिलासादायक बातमी असून शुक्रवारी रात्री उशीरा ४२ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून त्यामध्ये रत्नागिरीतील जिल्हा रुग्णालयात असलेल्या १४ व्यक्ती तर कळंबणी रुग्णालयातील २८ व्यक्तींचे अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत. मात्र ८० अहवाल अद्यापही प्रलंबित असून त्यामध्ये ६२ अहवाल रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील असून १८ अहवाल कळंबणी येथील आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ५ कोरोनाचे बाधीत रुग्ण आढळून आले. त्यामध्ये पहिला रुग्ण हा गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे आढळून आला होता. दुबईहून तो गुहागर येथे परत आला होता. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तर दुसरा रुग्ण रत्नागिरी शहरातील राजीवडा – शिवखोल परिसरातून आढळून आला होता. ‘मरकज’हून रत्नागिरीत परतला होता. त्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्या पाठोपाठ साखरतर येथील एका ५२ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला, त्या पाठोपाठ तिच्या जावेचा अहवालही पॉझिटिव्ह आला होता. पाचव्या रुग्णाचा अहवाल कळंबणी रुग्णालयातून पाठविला होता. मात्र अहवाल येण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. त्याचाही अहवाल पॉझिटिव्ह आला होता. 
जिल्ह्यात एकूण ५ कोरोनाबाधीत रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली होती. पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध सुरु झाला. त्यांची ट्रॅव्हलिंग हिस्ट्री तपाासण्यात आली होती. ट्रॅव्हलिंंग दरम्यान संपर्कात आलेल्या व्यक्तींचा देखील शोध घेण्यात आला.
पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची यादी करुन काहींना होम क्वॉरंटाईन तर काहींना इन्स्टिट्यूट क्वारंटाईन केले आहे. क्वारंटाईन झालेल्या व्यक्तींची संख्या देखील कमालीची वाढली आहे. क्वारंटाईन असलेल्या व्यक्तींना कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले जातात. त्यानुसार रत्नागिरीत शेकडोच्या घरात क्वारंटाईन झालेल्या व्यक्तींची तपासणी यापूर्वी झाली आहे. हा आकडा दिवसागणीक वाढत आहे. 
शुक्रवारी तब्बल रत्नागिरी जिल्ह्यातून ८० नमुने तपासणीसाठी मिरज येथे पाठविले होते. त्यामुळे ६२ रुग्ण हे जिल्हा रुग्णालयातील असून १८ नमुने कळंबणी रुग्णालयातील आहेत. हे सर्व अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. शनिवारी रात्री उशीरापर्यंत हे अहवाल प्राप्त होण्याची शक्यता जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांनी वर्तविली आहे.
दरम्यान रत्नागिरीकरांसाठी एक दिलासादायक बातमी आली असून शुक्रवारी रात्री उशीरा ४२ जणांचे अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत. त्यामध्ये जिल्हा रुग्णालयातील १४ व्यक्ती तर कळंबणी रुग्णालयातील २८ व्यक्तींचा समावेश आहे.