कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जि. प.  पदाधिकारी ग्रामीण स्तरावर 

रत्नागिरी:-कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी जिल्हा परिषद कर्मचारी मोठ्यासंख्येने कार्यरत आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, उपाध्यक्ष महेश नाटेकर यांनी खेड, मंडणगड, चिपळूण दौरा केला. यामध्ये मंडणगडात शिवभोजन थाळी सुरु करण्यातील अडथळा येत असल्याचे लक्षात आले. ही बाब श्री. बने यांनी जिल्हाधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर एका तासात त्यावर कार्यवाही झाली.
खेड, मंडणगड, दापोलीसह चिपळूण पंचायत समितींमार्फत कोरोनाविषयी आरोग्य विभागाकडून सुरु असलेल्या कामकाजाचा आढावा जिल्हा परिषद अध्यक्ष बने यांनी घेतला. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे जे आदेश देत आहेत, त्याचे पालन गावपातळीवर झाले पाहीजे. त्यासाठी नियुक्त केलेल्या ग्राम कृतीदलांनी लक्ष ठेवावे. ग्रामस्थांनीही आरोग्य यंत्रणेला सहकार्य केले पाहीजे अशा सुचना त्यांनी दिल्या आहेत. तसेच चांगले काम करणार्‍या लोकांवरी शाबासकीची थाप दिली. अजून लढाई संपलेली नाही, कर्मचार्‍यांना जिल्हा परिषदेकडून जे सहकार्य हवे ते दिले जाईल असे बने यांनी सांगितले.
मंडणगड शहराची लोकसंख्या कमी असल्यामुळे मध्ये शिवभोजन थाळी सुरु करण्याची अडचण होती. ही बाब लक्षात आल्यानंतर अध्यक्ष बने यांनी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याशी संपर्क साधला. तसेच मंडणगडमधील परिस्थिती त्यांच्यापुढे मांडली. शहरामध्ये 862 कामगार परगावाहून विविध ठिकाणी कामासाठी आलेले आहेत. त्यातील काही लोकांना मालकांनी तर काहींना कंत्राटदारांनी जेवण, निवासाची व्यवस्था केली आहे; परंतु काहींना मालकच नसल्यामुळे जेवणाची गैरसोय होत आहे. त्यांच्यासाठी शिवभोजन थाळी सुरु करणे आवश्यक असल्याचे श्री. बने यांनी सांगितले. ही परिस्थिती लक्षात आल्यानंतर एका तासात जिल्हाधिकार्‍यांनी मंडणगड तहलिसदारांना शहर परिसरात शिवभोजन थाळी सुरु करण्याचे आदेश दिले आहेत.

अध्यक्ष बने यांनी आढावा घेतल्यानंतर अनेक कर्मचार्‍यांनी आपल्या समस्या मांडल्या. माहिती घेण्यासाठी गावागावात जाणार्‍या आशा व आरोग्य कर्मचारी यांना ग्रामस्थांचे सहकार्य मिळत नाही. अशावेळी महिला म्हणून अनेकवेळा अडचणी निर्माण होता. सर्व्हेक्षणात त्यांच्या मदतीला ग्राम कृतीदलातील पुरुष सदस्यांना घेण्याच्या सुचना अध्यक्ष बने यांनी दिल्या आहेत.