रत्नागिरी:-एकावेळी ९० कोरोनाच्या टेस्ट होत आहेत. ही टेस्ट करण्यास मर्यादा असल्याने पाठविलेल्या नुमन्यांचे अहवाल येण्यास विलंब होत आहे. यामुळे संशयितांचे अहवाल येण्यास विलंब होत असून पुढील कार्यात अडचणी निर्माण होत असल्याची खंत रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, बुधवारी रात्री राजीवडा-साखरतर परिसरातील १८ व्यक्तींना जिल्हा रुग्णालयात क्वारंटाईन करुन त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत.
राजीवडासह साखरतर परिसरात कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर या परिसरातील ३ कि.मि.चा परिसर हा कोरोनाबाधीत क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे. या परिसरात बाहेरुन आलेल्या व्यक्तींचा शोध घेवून त्यांना क्वारंटाईन केले जात आहे. बुधवारी रात्री उशिरा साखरतर, शिरगांव परिसरातून १८ व्यक्तींना ताब्यात घेवून त्यांना जिल्हा रुग्णालयात क्वारंटाईन केले आहे.
दरम्यान, सुरुवातीला कोरोना संशयित असलेल्या रुग्णांचे नमुने पुणे येथे पाठविले जात होते. मात्र आता शासनाने नवीन सेंटर सुरु केली असून रत्नागिरी-सिंधुदुर्गसाठी सांगली सेंटर मिळाल्याने आता येथील सर्व नमुने सांगली येथील इन्स्टिट्यूटमध्ये पाठविले जात आहेत. मात्र एकावेळी ९० नमुन्यांची तपासणी होत आहे. तपासणीवर मर्यादा असल्याने चार-चार तास प्रतिक्षा करुन पुढील नमुने तपासले जात आहेत. त्यामुळे अहवाल येण्यास विलंब होत असल्याची खंत येथील वैद्यकीय अधिकार्यांनी व्यक्त केली आहे.
जिल्हा रुग्णालयातून बुधवारी १७ जणांचे तर कळंबणी उप जिल्हा रुग्णालयातून २१ जणांचे नमुने तपासणीसाठी सांगली येथे पाठविले आहे. मात्र त्याचा अहवाल गुरुवारी रात्री उशिरापर्यंत प्रलंबीत होता.