ट्रकचा टायर फुटून कामगाराचा मृत्यू

चिपळूण:-येथील वालोपे परिसरात पेट्रोल पंपावर ट्रकच्या टायरमध्ये हवा भरताना टायर फुटला.हवेच्या दबावाने हवा भरणारा कामगार दूरवर फेकला गेला आणि जमिनीवर अपटल्याने त्याला मोठी दुखापत होऊन तो जागीच गतप्राण झाला.बाबू कन्नन तरमल (५६)असे त्याचे नाव असून गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली.

      या बाबत चिपळूण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार चिपळूण मुंबई गोवा महामार्गावर वालोपे येथील पेट्रोल पंपाच्या बाजूला टायर पंक्चर काढण्याचे दुकान आहे.या येथे बाबू तरमल हा काम करतो.गुरुवारी सायंकाळी तो एका ट्रकच्या टायरमध्ये हवा भरत होता.टायरमध्ये हवा प्रमाणापेक्षा जास्त झाली त्यामुळे टायर फुटला.टायर फुटताच प्रचंड हवेचा दाब बाहेर पडला आणि हवेच्या दाबामुळे बाबू दूरवर फेकला जाऊन जमिनीवर आपटला.यामध्ये त्याच्या डोक्याला मोठी दुखापत झाली.

          येथील पेट्रोल पंप चालक तसेच कामगारांनी त्याला चिपळूण येथील लाईफकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.या बाबत सतीव कृष्णनन तक्खन यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात खबर दिली असून चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद  करण्यात आली आहे.