जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी खेडमध्ये गेल्यानंतर तालुका प्रशासन हादरले.

 

मृत व्यक्तीच्या पत्नी – मुलांसह २० जण आयशोलेशन वार्डमध्ये दाखल

तालुका प्रशासनाने कठोर उपाययोजना

रत्नागिरी:-खेड तालुक्यात कोरोनाचा पहिला बळी गेल्यानंतर तालुका प्रशासनाने कठोर उपाययोजना करायला सुरवात केली आहे . बळी गेलेली व्यक्ती ज्या अलसुरे गावातील आहे त्या गावांसह लगतचे कोंडिवली , निळीक आणि भोस्ते ही गावे देखील सिल केली आहेत . कोरोनाचा पहिला बळी ठरलेली व्यक्ती खेड शहरात वारंवार आल्याचे स्पष्ट झाले आहे . शिवाय त्याचा खेड शहरातील डाक बंगला परिसरात फ्लॅट असून परदेशातून आल्यावर सुरवातीचे काही दिवस तो तिथे राहिल्याचे स्पष्ट झाले असल्याने हा परिसरही सिल करण्यात आला आहे . हातावर क्वारंटाईनचा शिक्का असतानाही त्याच्यावर ज्या खासगी डॉक्टरने उपचार केले त्या डॉक्टरच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा दवाखानाही सिल करण्यात आला आहे . दरम्यान खेड तालुका प्रशासनाने औषधांची दुकाने वगळता खेडची बाजारपेठ पुर्णपणे बंद केली असून नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. गेले काही दिवस कोरोनाच्या दहशतीखाली असलेला तालुका आता पुर्णपणे हादरून गेला आहे. दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून आता आरोग्य विभाग आणि तालुका प्रशासनाने त्याची पत्नी , मुलं आई – वडील यांच्यासह तो ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात आला अशा २० जणांना ताब्यात घेऊन कळंबणी येथील आयशोलेशन वार्डमध्ये ठेवले आहे . या साऱ्यांचे स्वॉब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्याच्या अहवालाची प्रतिक्षा आहे . या घटनेने पोलीस , महसूल , आणि आरोग्य यंत्रनेवरील ताण कमालीचा वाढला आहे .

खेडमध्ये कोरोनाने झालेला मृत्यु हा संपुर्ण कोकणातील पहिला बळी असल्याने जिल्हा प्रशासनानसह आरोग्य यंत्रणाही हादरुन गेली आहे . जी व्यक्ती कोरोनाची पहिला बळी ठरली ही व्यक्ती १७ मार्च रोजी दुबई येथन खेड येथे आली होती . सुरवातीचे काही दिवस म्हणजे २२ मार्च पर्यंत ही व्यक्ती खेड शहरातील डाकबंगला परिसरात असलेल्या त्याच्या फ्लॅटवर पत्नी आणि तीन मलांसह रहात होती . २२ मार्चला ही व्यक्ती त्याच्या मुळगावी म्हणजे अलसुरे येथे आली. या ठिकाणी तो त्याची पत्नी , आई – वडील आणि तीन मुलगे असे रहात होते . या दरम्यान गावातील काहीजणांनी त्याची भेटही घेतलेली होती. त्याच्या हातावर कोरोनटाईनच्या शिक्का असल्याने त्याला घरातून बाहेर न पडण्याच्या सुचना करण्यात आल्या होत्या . मात्र तरीही ही व्यक्ती कधी रिक्षाने तर कधी दुचाकीने खेड शहरात वारंवार जात होती. दरम्यान प्रकृती दिवसेंदिवस चिंताजनक होवू लागल्याने गेले काही दिवस तो खेड येथील एका खासगी दवाखान्यात जावून उपचार घेऊ लागला होता . त्याच्या हातावर कारनटाईनचा शिका असल्याने त्या डॉक्टरने त्याच्यावर खासगीत उपचार न करता त्याला शासकिय रुग्णालयात जाण्याचा सल्ला द्यायला हवा होता . शिवाय याबाबत तालुका प्रशासनासह आरोग्य यंत्रणेला कळवायला हवे होते . मात्र तसे काहीही न करता हा डॉक्टर त्याच्यावर वारंवार उपचार करत होता . त्याची प्रकृती आणखीनच ढासळल्यानंतर डॉक्टरने त्याला दुसऱ्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला . त्यानुसार नातेवाईकांनी त्याला दुसऱ्या एका रुग्णालयात हलविले मात्र रुग्णालय प्रशासनाने त्याला दाखल करून घेण्यास नकार दिला . त्यानंतर त्याला आणखी एका ओळखीचा डॉक्टर असलेल्या रुग्णालयात नेले मात्र या रुग्णालयातील डॉक्टरने त्याला दरवाज्यातूनच शासकिय रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला . त्यानंतर ६ एप्रिल रोजी रात्री १ . ३० वाजण्याच्या सुमारास त्याला कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले . येथील आरोग्य अधिकान्यांनी त्याला तात्काळ दाखल करून घेत त्याचे नमुने प्रयोग शाळेत पाठवून दिले . दरम्यान त्याची प्रकृती आणखीनच खालावल्याने त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले . त्याच्यावर उपचार सुरु असतानाच ९ एप्रिल रोजी त्याचा मृत्यु झाला . मात्र तो पर्यंत त्याच्या नमुन्यांचा अहवाल आलेला नसल्याने त्याचा मृत्यु नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट झाले नव्हते . अखेर ८ . ३० वाजण्याच्या सुमारास आलेल्या अहवालात तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आणि तो ५० वर्षीय इसम कोकणातील कोरोनाचा पहिला बळी ठरला .