कोरोना बाधित रुग्णाचा जिल्हा रुग्णालयात उच्छाद

कर्मचाऱ्यांवर हल्ला, कर्मचारी दबावाखाली

रत्नागिरी:- गुरुवारी रात्री जिल्हा शासकीय रुग्णालयात एक गंभीर घटना घडली. काल रात्री एका रुग्णाचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यावर त्याच्या नातेवाईकांना याची कल्पना देण्यात आली. यावेळी या नातेवाईकांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसोबत गैरवर्तन करण्याची घटना घडली. हा रिपोर्ट खोटा आहे असे म्हणत नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातला व नातेवाईक आक्रमक झाले. मला कोरोना विभागात हलवू नका मला काही झाल नाही हे रिपोर्ट खोटे आहेत असे म्हणत खुद्द पेशंटने हाताच्या शिरा कापून आत्महत्या करण्याची धमकी दिली. याचवेळी रुग्णाच्या मुलाने देखील बिल्डींग वरून उडी मारून जीव देण्याची धमकी दिली. यानंतर पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिसांना घेऊन कर्मचारी आत गेले असता रुग्णाच्या मुलाने भिंतीवरील ट्यूब काढून कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून आला. यानंतर जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर अश्फाक काझी यांना बोलावण्यात आले, त्यांनी समजूत काढल्यावर रुग्ण आणि नातेवाईक काही काळ शांत झाले. मात्र त्यानंतर देखील रुग्णाचा मुलगा हातात दगड घेऊन रुग्णालयात फिरत होता. यानंतर खुद्द रूग्णानेच कर्मचाऱ्याला धमकावले व माझी माणसे बोलावली तर तुम्हाला कुठे गायब करतील समजणार देखील नाही अशी धमकी दिली. रात्री साडेअकरा पासून अडीच वाजेपर्यंत हा प्रकार चालू होता. या संपूर्ण घटनेचे कथन जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी आपल्या वरिष्ठांकडे केले आहे. या घटनेमुळे जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी वर्ग खूप घाबरला आहे व आमच्या सुरक्षेचे काय ? असा प्रश्न उपस्थित करू लागला आहे.