कोरोनाविरुद्धच्या युद्धात रस्त्यावरची लढाई लढणारा पोलिस कर्मचारी पगाराविना!

रत्नागिरी:-सध्या कोरोना विरूद्धच्या युद्धात रस्त्यावरची लढाई पोलीस लढत आहे. मात्र, जवळपास अर्धा एप्रिल संपत आला तरी पोलीसांचे पगार अद्याप झालेले नाहीत. सरकारनं मार्च महिन्याचा पगार दोन टप्यांत देण्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे सरकार पोलीस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे पूर्ण पगार करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. मात्र, शासन निर्णयात त्याचा उल्लेख नसल्यानं पोलीसांच्या पगाराबाबतच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
 रत्नागिरी जिल्ह्यात जवळपास 1400 पोलीस आहेत. या पोलीस कर्मचाऱ्यांचे पगार न झाल्याने या महिन्याचं बजेट कसं सांभाळायचं. कारण, 10 तारीख उलटून चाललीये. मात्र, पोलीसांच्या पगाराचं नाव नाही. मिळणारा पगारही पूर्ण मिळेल का?, याची शाश्वती नाही. 
  दरम्यान राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीत आर्थिक संकट देखील समोर उभं ठाकल्याने सरकारने पगार कपात करुन टप्प्याटप्प्यानं देण्याचं सांगितलं आहे. मात्र आरोग्य कर्मचारी आणि पोलिस कर्मचारी जे लोक कोरोनाची दोनहात करण्यासाठी प्रत्यक्ष या लढाईत मैदानात उभे आहेत, त्यांचा पगार कपात करणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. मात्र तरीही पोलिस कर्मचाऱ्यांचा पगार झालेला नाही. यामुळे अनेक पोलीस कर्मचारी आर्थिक विवंचनेत आहेत.