वाहतुकीतील अडचणी दूर; 27 हजार पेट्या वाशी मार्केटला .

रत्नागिरी:- वाहतुकीतील अडचणी दूर झाल्यामुळे कोकणातून वाशी मार्केटला रोज 27 हजार पेटी हापूस दाखल होत आहे. त्यातील 282 मेट्रीक टन हापूस कुवेत, बहरीन, संयुक्त अरब अमिरातीला जहाज मार्गे पाठविण्यास हिरवा कंदिल मिळाला आहे. पंधरा कंटेनरमधून हा आंबा येत्या दोन दिवसात रवाना होईल असे पणन मंडळाकडून सांगण्यात आले.

वाढत्या उष्म्यामुळे आंबा तयार होण्याची प्रक्रिया वेगाने सुरु झाली आहे; मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आंबा विक्रीत मोठा अडथळा निर्माण झाला आहे.

जगभरात कोरोनाचा धुमाकुळ सुरु झाल्याने त्याचा परिणाम हापूसच्या निर्यातीवरही झालेला होता. शुक्रवारपासून निर्यातीला सुरवात झाली असून पहिल्या टप्प्यात वाशी येथून 105 मेट्रीक टन हापूस समुद्रमार्गे संयुक्त अरब अमिराती, ओमानला गेला. त्यानंतर आता आखातातील तीन देशांमध्ये आणखीन 282 मेट्रीक टन आंबा पाठविण्यासाठी परवानगी मिळाली आहे. निर्यातीसाठी आवश्यक फायटोसॅनिटरी सर्टीफिकेट संबंधित यंत्रणेकडून प्राप्त झाले असून 15 कंटेनर वाशीतून बंदरावर पाठविले आहे. याचा प्रवास दोनच दिवसात सुरु होणार आहे. कुवेत, बहरीन, संयुक्त अरब अमिरातीला आंबा पोचण्यासाठी सहा ते सात दिवस लागतात. निर्यातीसाठी आखाती देशांना फळे, भाजीपाला पुरवठा करणार्‍या निर्यातदारांनी पुढाकार घेतल्यामुळे कोकणातून आलेला आंबा वाशीमध्ये पडून राहणार नाही, याची हमी मिळू लागली आहे. 

ग्राहकच उपलब्ध होत नसल्यामुळे वाशीतील अनेक अडत्यांनी कोकणातील बागायतदारांना हापूस पाठवू नका असे निरोप दिले होते. त्यामुळे आंबा बागायतदार निराश झाले होते. पणन, कृषी मंडळाच्या संयुक्त प्रयत्नातून निर्यातीला चालना मिळाल्याने आपसूकच व्यापारीही आंबा घेण्यासाठी सरसावले आहेत; परंतु पेटीचा दर पाचशे रुपयांपासून दोन हजार रुपयांपर्यंतच मिळत असल्याचे सांगितले जात आहे.