रत्नागिरी : प्रतिनिधीकोरोनामुळे देश लॉकडाऊन असल्याने उद्योग व्यवसाय बंद आहेत. शिवाय व्यापारीपेठा देखील ठप्प असल्याने त्याचा परिणाम विजेच्या मागणीवर झाला आहे. मार्च एप्रिलमध्ये उकाडा वाढतो त्यामुळे विजेची मागणी वीस ते एकवीस हजार मेगावॅट पर्यत पोहोचते. मात्र लॉकडाऊनमुळे विजेच्या मागणीत घट झाली असून सध्या १५ हजार ४८० मेगावॅट इतकीच मागणी होत आहे. चार हजार ५२० मेगावॅटने मागणीत घट झाली आहे.
देश लॉकडाऊन असल्याचा परिणाम उद्योग, व्यवसायांवर झाला आहे, त्याचप्रमाणे शेतीच्या कामांना मजूर उपलब्ध होत नसल्याने शेतीची कामे देखील ठप्प आहेत. परिणामी कृषीपंपासाठी लागणाºया विजेच्या मागणीत घट झाली आहे. लॉकडाऊनमुळे नागरिक घरात आहे. हवामानातील बदलामुळे तसेच अवेळचा, वादळी पाऊस ठिकठिकाणी पडत आहे. दिवसा उकाडा असला तरी रात्री हवेत बºयापैकी गारवा असतो. त्यामुळे कूलर, एसीचा वापर सध्या कमी होत असल्याने विजेच्या मागणीवर त्याचा परिणाम झाला आहे.
राज्यात महानिर्मितीकडून ३,३५०, खासगी कंपनीकडून ४३७०, तर मुंबईतून १६०० मेगावॅट मिळून एकूण ८८०० मेगावॅट विजेची निर्मिती होत आहे. केंद्रातून ६६०० मेगावॅट विजेचा पुरवठा होत आहे. त्यामुळे सद्यस्थितीत मागणी प्रमाणे पुरवठा होत असल्याने काही वीजनिर्मितीचे संच बंद ठेवण्यात आले आहेत. विज साठवून ठेवणे शक्य नसल्याने नाशिक, खापखेडा, भुसावळ, परळी येथील वीजनिर्मिती संच तात्पुरते बंद ठेवण्यात आले आहेत.
चंद्रपूर वीजनिर्मिती केंद्रातून ७५०, पारस येथे ४५०, उरण येथे २६२, कोयना येथे २३३ मेगावॅट विजनिर्मिती मात्र सुरू आहे. मागणीत घट झाल्यानेच मागणीप्रमाणेच निर्मिती करण्यात येत आहे.
शासकीय, तसेच खासगी कार्यालये बंद असल्याने तेथील विजेच्या मागणीवर परिणाम झाला आहे. लॉकडाऊनमुळे सध्या तरी मागणी घटली असून लॉकडाऊननंतर पुन्हा विजेच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता आहे.