जिल्हा रुग्णालय आता फक्त कोरोना रुग्णालय.

रत्नागिरी:-जिल्ह्यात झपाट्याने वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या लक्षात ठेवून जिल्हा शासकिय रुग्णालयाचे रुपांतर कोरोना रुग्णालयात करण्यात आले आहे. तर जिल्हा रुग्णालयातील अपघात विभागासह अन्य सर्व विभाग शाळा, महाविद्यालयांसह खाजगी रुग्णांलयात स्थलांतरीत करण्यात आले आहेत. जिल्हा रुग्णालयातील अपघात विभाग शिर्के हायस्कूलमध्ये हलविण्यात आला आहे. 

रत्नागिरी जिल्ह्यात असलेल्या एकूण चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी खेड तालुक्यात एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणेने खबरदारी म्हणून कोरोना रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालय सज्ज करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करत असताना इतर रुग्णांना सुरक्षित उपचार मिळावेत यासाठी जिल्हा रुग्णालयातील अन्य विभाग गुरुवारपासून इतर ठिकाणी वर्ग करण्यात आले आहेत.
शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शिर्के प्रशालेत अपघात विभाग सुरु करण्यात आला आहे. तर एसटी बस्थानकासमोरील स्वस्तिक रुगणालय, साफल्य रुग्णालय, लोटलीकर, चिरायू हॉस्पिटल तर लहान मुलांचा विभाग डॉ.चौधरी यांच्या रुग्णालयात हलविण्यात आला आहे.

सध्या ज्या रुग्णालयात जिल्हा रुग्णालयातील विभाग हलविण्यात आले आहेत. तेथेच सरकारी खर्चात रुग्णांवर उपचार होणार आहेत. रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांनी याठीकाणी उपचार करुन घ्यावेत असे आवाहन जिल्हा रुग्णालयाच्यावतीने करण्यात आले आहे.