क्षुल्लक कारणावरून झालेल्या मारहाणीत 45 वर्षीय इसमाचा खून


तवसाळ :-गुहागर तालुक्यातील तवसाळ तांबडवाडी येथे मासेमारी करता वापरण्यात येणारे पागाची विचारणा केली म्हणून झालेल्या वादाचे पर्यावसन मारहाणीत झाले. यामध्ये 45 वर्षीय इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी 3 वाजताच्या दरम्यान घडली.
कमलाकर शंकर पारदळे, वय 45 राहणार तवसाळ तांबळवाडी असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. तवसाळ तांबडवाडी मधील मयत कमलाकर पारदळे व मारहाण करणारा संशयित आरोपी वसंत कृष्‍णा पारदळे या दोघांची घरे शेजारी आहेत. मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारे दोघे मित्र होते. लॉकडाऊनमुळे रोजंदारी नाही. यामुळे खाडीतील मासे पागुन त्यावर रोजच्या जेवणाची व्यवस्था हे दोघे आपल्या कुटुंबासाठी करत होते. या दोघांनी मिळून मासेमारी करता पाग घेतला होता. बुधवारी दुपारी वसंत कृष्‍णा पारदळे यांनी कमलाकर पारदळे यास पाग आहे कोठे, अशी विचारणा केली या झालेल्या बाचाबाची मध्ये मारहाणीत रूपांतर झाले. वसंत पारदळे याने काठीने केलेल्या मारहाणीत डोक्याला जबर मार लागल्याने, त्यातच कमलाकर पारदळे खाली कोसळताना दगडावर आपटल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. लॉकडाऊन असल्यामुळे उपचाराकरता याला नेणार कसे असे दोघांच्याही कुटुंबाला प्रश्न पडला. यामुळे सायंकाळी 5 वाजता त्याच्यावर अधिक उपचारासाठी नरवण येथील एका खाजगी दवाखान्यात नेण्यात आले होते. तेथील डॉक्टरने वाहनांमध्ये त्याची तपासणी करून तो मयत झाल्याचे सांगितले. बुधवारी 3 वाजताची घटना सायंकाळी उशिरापर्यंत कोणालाही कळू दिली नव्हती. अशामध्ये गुहागर पोलिसांना समजतात गुहागर पोलीस निरीक्षक अरविंद बोडके, गणेश कादवडकर, किरणकुमार पाटील, श्री जाधव यांनी पहाटे 3 वाजता घटनास्थळाला भेट दिली. गुरुवारी सकाळी कोळवली प्राथमिक आरोग्य केंद्रात कमलाकर पारदळे याचे शवविच्छेदन करण्यात आले. गुहागर पोलिसांनी या खून प्रकरणी वसंत कृष्णा पारदळे यास अटक केली आहे. मयत कमलाकर पारदळे याला पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.