रत्नागिरी:-कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्व रत्नागिरीच्या नागरिकांनी योग्य काळजी घ्यावी आणि या कोरोना वर मात करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे परिवहन मंत्री ॲङ अनिल परब यांनी केले आहे
डोळ्यांच्या आजारामुळे जिल्ह्यात यायला मला जमलेले नाही. मात्र सकाळ-संध्याकाळ जिल्हाधिकारी, पोलिस प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेकडून माहिती घेऊन पुढे काय करायचे याचा निर्णय घेतला जात आहे, असे पालकमंत्री ॲङ परब यांनी जारी केलेल्या व्हिडीओ फितीत कळविले आहे.
जिल्ह्यात खेड तालुक्यात कोरोनाने मृत्यूची एक दुर्दैवी घटना घडली आहे. तथापि एक रुग्ण बरा झाला असून इतर दोघांची प्रकृती सुधारत आहे, ही सकारात्मक बाब आहे. असे सांगून ते म्हणाले की यापुढील काळात कुणालाही सर्दी, खोकला, ताप असेल अशांनी त्वरित रुग्णालयात तपासणी करून घ्यावी. अशा संशयित रुग्णांनी स्वतःला इतरांपासून दूर ठेवावे, असे आवाहनही त्यांनी केले.
रत्नागिरी जिल्ह्यात या विषाणूचा प्रसार रोखणे व रत्नागिरी कोरोना मुक्त करणे यात प्रत्येक नागरिकाचे सहकार्य लागणार आहे. प्रत्येकाने याप्रसंगी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री ॲङ परब यांनी केले आहे.