गाव विकास समिती,रत्नागिरी जिल्हा संघटनेचे जिल्हाधिकारी यांना पत्र
देवरुख:-कोरोना साथीमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले असून अनेक गावांत शिमग्याला चाकरमानी आल्याने त्यांच्या घरातील माणसांची संख्याही वाढली आहे.ज्यांचे रेशनकार्ड मध्ये नाव नाही व ज्यांना निकषांची अडचण येत आहे अशा गरजू नागरिकांना ही धान्य उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी केली आहे.
कोरोना संकटामुळे सर्वसामान्य माणसाला अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे.लॉक डाऊन मुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत.सामान्य माणसाची आर्थिक कुचंबना झाली आहे.सरकारने शिधापत्रिका धारक नागरिकांना धान्य देण्याचा निर्णय घेतल्याने या नागरिकांना थोडा दिलासा मिळणार आहे.याच बरोबर ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही अशा लोकांना ही सरकारने किमान 2 महिन्याचे धान्य उपलब्ध करून द्यावे,कारण शिमगा उत्सवात मोठ्या प्रमाणात चाकरमानी कोकणात आलेला आहे.कोरोना संकट आल्याने हे नागरिक पुन्हा शहरात गेले नाहीत.त्यामुळे साहजिकच घरातील सदस्यांची संख्या वाढली आहे.या वाढलेल्या सदस्यांची नावे रेशनकार्ड मध्ये नसल्याने त्यांना धान्य मिळणार नाही, यावर प्रशासनाने तोडगा काढून या संकटाच्या काळात नागरिकांना किमान 2 महिन्याचे धान्य उपलब्ध करून द्यावे अशी मागणी सुहास खंडागळे यांनी केली आहे.दुसरीकडे ज्यांची रेशनकार्ड आहेत मात्र धान्य वाटपाच्या निकषात ते बसत नाहीत अशा नागरिकांना एकंदरीत स्थिती लक्षात घेऊन अल्प दरात धान्य उपलब्ध करून देण्यात यावे अशीही मागणी सुहास खंडागळे यांनी केली आहे.