राजीवडा, साखतरमधील 52 जण क्वॉरंटाईन

रत्नागिरी:-राजीवडा व साखरतर येथील पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या तब्बल ५२ जणांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. त्यामध्ये २ डॉक्टरांचा समावेश असून शहरातील एका खाजगी हॉस्पिटलमधील रुग्णांना बुधवारी अन्य हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. 

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाची लागण झालेले ३ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये गुहागरमधील रुग्ण पूर्णत: बरा झाला असून मंगळवारी साखरतरमधील एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तात्काळ साखरतर परिसर पोलिसांनी सील केला होता. ती ५२ वर्षीय महिला बाहेर कोठेही गेलेली नसताना तिला लागण कशी झाली? असा प्रश्‍न असतानाच तिच्या संपर्कात आलेल्या १७ जणांना आरोग्य विभागाने ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये १५ व्यक्ती या तिच्या कुटुंबातील असून २ व्यक्ती परिसरातील आहेत.

साखरतर येथील या महिलेला गेल्या काही दिवसांपासून सर्दी, ताप, खोकला होता. त्यामुळे ती परिसरातील एका महिला डॉक्टरकडे उपचाराकरीता गेली होती. या डॉक्टरकडे तिचे वारंवार येणेजाणे होते अशी माहिती मिळत आहे.

औषधोपचाराने बरे वाटत नसल्याने ती महिला घरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचाराकरीता दाखल झाली होती. त्यामुळे आरोग्य विभागाने या खाजगी हॉस्पिटलमधील डॉक्टर्ससह बसणी येथील एका डॉक्टरला क्वारंटाईन केले आहे.

ती महिला ज्या खाजगी हॉस्पिटलमध्ये सुरुवातीला दाखल झाली होती ते हॉस्पिटल बुधवारी सकाळी रिकामे केले. या हॉस्पिटलमधील रुग्णांना अन्यत्र हलविण्यात आले आहे तर संपूर्ण हॉस्पिटल निर्जंतूक केले आहे.

साखरतर येथील महिलेच्या संपर्कात आलेले १७ जण सध्या जिल्हा रुग्णालयात क्वॉरंटाईन असून त्यातील १५ जणांचे स्वॅब बुधवारी रात्री तपासणीसाठी पाठविले जाणार आहेत. तर आतापर्यंत शिवखोल, राजीवडा व साखरतर या परिसरातील ५२ व्यक्तींना जिल्हा रुग्णालयात क्वारंटाईन केले आहे. त्यामध्ये ३३ व्यक्ती या शिवखोल, राजीवडा परिसरातील आहेत.

दरम्यान पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या अन्य व्यक्तींचा शोध घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु असून साखरतर येथील महिलेच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.