उन्हाच्या वाढल्या झळा; टंचाईला जिल्हा सामोरा

रत्नागिरी:-कोरानापाठोपाठ जिल्हावासीयांना उन्हाच्या तापाला सामरे जावे लागत आहे. जिल्ह्यात उन्हाचा पारा 36 अंशावर टेकला आहे. पाऊस लांबल्याने टंचाई उशिरा सुरू झाली सली तरी वाढत्या उष्म्याने पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे. मार्चअखरेच्या आठवड्यात पहिला टँकर खेडमध्ये धावला असून सध्या जिल्ह्यात 10 गावांमधील 18 वाड्यांना 3 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

 दरवर्षी रत्नागिरी जिल्ह्यात मार्चच्या पहिल्या आठवड्यात टंचाईला सुरवात होते. ती परंपरा यंदा खंडीत झाली असून मार्चच्या शेवटच्या आठवड्यात खेडमध्ये पहिला टँकर सुरु झाला. त्यानंतर हळूहळू अन्य तालुक्यांमधून टँकरने मागणी सुरु झाली आहे. नोव्हेंबर महिन्यापर्यंत यंदा पाऊस सुरु होता. भुजल विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार यंदा पाणी पातळीत वाढ झाल्याचे दर्शवत होते. त्यामुळे टंचाईची तिव्रता कमी होणार असा अहवाल जिल्हाप्रशासनाकडे पाठविण्यात आला होता; मात्र धनगरवाड्या किंवा डोंगराळ भागात राहणार्‍या वस्तींना पाणीपुरवठा करणारे पर्यायच नसल्यामुळे त्यांना टँकरचा एकमेव पर्याय उतरतो. त्याचाच प्रत्यय खेड तालुक्यात येतो. सध्या 5 गावांमधील 5 वाड्यांना एका टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. चिपळूणमधील तिवरे गावासह 5 गावातील 12 वाड्यांना टँकर सुरु आहे. तसेच लांजा तालुक्यातील एका गावातील एका वाडीला टँकरने पाणी दिले जाते. सुमारे 1800 लोकांना पाणी पुरवठा केला जात असून 
तीन टँकर सुरु आहेत.
  जिल्ह्याचा टंचाई आराखडा 15 कोटी 63 लाखाचा बनविण्यात आला आहे. त्यामध्ये अडीचशे गावातील साडेचारशे वाड्यांना भविष्यात टंचाई भासु शकते, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामध्ये सर्वाधिक पाणी योजना दुरुस्तीसाठी निधीची तरतुद करुन ठेवण्यात आली आहे. ती कामे जिल्हाप्रशासनाची मंजूरी मिळाल्यानंतर तत्काळ सुरु करण्यात येणार आहे.