राजीवडा खाडीत मत्स्य विभागाकडून गस्त

रत्नागिरी:-कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यानंतर खाडीकिनारी वसलेल्या राजीवडा परिसरातील काही नागरिक मच्छीमारी नौकांकडून अन्यत्र जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे आढळून येत होते. त्यावर रोख लावण्यासाठी मत्स्य विभागाकडून दोन मच्छीमारी नौकांसह चार सुरक्षा रक्षकांची गस्त खाडी किनारी घातली जात आहे.
मुंबई येथून राजीवडा शिवखोल भागामध्ये जमातीचे काही माणसे काही दिववसांपूर्वी आले होते. त्यातील एकाचा कोरोना झाल्याचे तपासणीनंतर निष्पन्न झाले होते. त्यामुळे हा संपूर्ण परिसर लॉक डाऊन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिले आणि त्यानंतर चार दिवसापासून हा परिसर पोलिसांनी लॉकडाऊन केला आहे. राजीवाडा परिसरात पोलिसांची 24 तास गस्त सुरु असूनही अनेक तरुण महिला वर्ग रस्त्यावर गटागटाने बाहेर पडत आहेत. त्यातून कोरोना बाधीतांची संख्या वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्हीची मदत घेतली आहे. राजीवडा पुलापासून 70 सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. त्याशिवाय येथील मच्छीमारी जेट्यांवरही नजर ठेवण्यात आली आहे. हा परिसर सील केल्यानंतर अनेक जण खाडीत मासेमारी करायला जातात. या नौकांचा आधार घेऊन अन्य गावांमध्ये नागरिक जाण्याची शक्यता आहे. 5 एप्रिलच्या मध्यरात्री मासेमारी करायला गेलेल्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गाव सील केल्यानंतर सलग दोन दिवस हे प्रकार आढळून आले होते. राजीवडा गावातून बाहेर पडल्यानंतर सोमेश्‍वर, कर्ला, जुवे गावे येतात. मच्छीमारी नौकांमधून येथील नागरिक अन्य गावांमध्ये जाऊ नयेत यासाठी राजिवडा ते सोमेश्वरपर्यंत खाडीत बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यासाठी दोन छोट्या बोटी घेण्यात आल्या असून त्यावर चार रक्षक चोविस तास नियुक्त केले आहेत. सहाय्यक मत्स्य आयुक्त एम. व्ही. भादुले यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे सुचनेनुसार ही कार्यवाही केली आहे.