रत्नागिरीत सापडला कोरोनाचा तिसरा रुग्ण.

रत्नागिरी:-रत्नागिरी तालुक्यातील साखरतर मोहल्ला येथे कोरोनाचा तिसरा रुग्ण आढळून आला आहे. साखरतर येथे घरीच राहणाऱ्या महिलेला कोरोनाची लागण झाल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. या परिसरात बाहेरून कुणी आले आहे का याचा शोध सुरू असून परिसर सील करण्याची तयारी प्रशासनाकडून सुरू झाली आहे.जिल्ह्यात आधी गुहागर नंतर राजीवडा येथे कोरोनाचा रुग्ण सापडला होता. राजिवडा येथे दिल्लीतून आलेल्या एकाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. याला पाच दिवसांचा कालावधी झालेला असतानाच मंगळवारी साखरतर येथील महिलेचा अहवाल पॉझीटीव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.
साखरतर येथील महिला शनिवार दि.४ एप्रिल रोजी ताप येत असल्याने शहरातील एका खाजगी रूग्णालयात उपचारासाठी गेली होती. तेथील डॉक्टर्सना महिलेमध्ये कोरोनाची लक्षणे असल्याचा संशय आल्याने या महिलेला जिल्हा शासकीय रूग्णालयात त्याच दिवशी दाखल करण्यात आले. त्यानंतर जिल्हा रूग्णालयाने संबंधित महिलेच्या थुंकी, स्वा@बचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. मंगळवारी दुपारी महिलेचा अहवाल जिल्हा रूग्णालयाला प्राप्त झाला असून ही महिला पॉझीटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. कोरोना बाधित महिला ज्या व्यक्तींच्या संपर्कात होती त्यांना तात्काळ तपासणीसाठी आणण्यात येणार आहे तर साखरतर मोहल्ला सील करण्याची कार्यवाही ग्रामीण पोलिसांकडून सुरू करण्यात आली आहे.