नगराध्यक्षांच्या प्रयत्नांवर लॉक डाउनमुळे पाणी.

रत्नागिरी:- सुधारित नळपाणी योजनेच्या कामाने गती पकडली असतानाच लॉक डाउनमुळ्ये नळपाणी योजनेचे काम पूर्णतः ठप्प झाले आहे. मे महिन्यापर्यंत निम्म्या रत्नागिरीला पाणी देण्याचा दृढ निश्चय नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी केला मात्र यावर लॉक डाउन मुळ्ये पाणी फेरले आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शिळ धरणाकडून येणारी मुख्य जलवाहिनी पावसाळ्यात वारंवार फुटते. त्यामुळे धरणात पाणी मुबलक असतानाही शहराचा पाणी पुरवठा खंडित होतो. यावर उपाय म्हणून नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी नवीन ६९ कोटी रू. खर्चाच्या पाणी योजनेतील धरणाच्या ठिकाणी असलेल्या नदीकडून टाकली जाणारी नवीन जलवाहिनी विमानतळाजवळ जुन्या जलवाहिनीला जोडण्याची तयारी केली होती. जेणेकरून जलवाहिनी फुटून वारंवार खंडित होणाऱ्या पाणी पुरवठ्यातील समस्या तात्पुरत्या स्वरूपात सुटू शकेल. मात्र, लॉकडाऊनमुळे हे काम बंद पडले आहे. नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी मिरजोळे येथे होणारी विरोधाची समस्यासुद्धा नगराध्यक्षांनी मध्यस्थी करून मार्गी लावली. नव्या पाणी पुरवठा योजनेतील जलवाहिनीचे काम वेगाने सुरूही झाले. परंतु, अवघ्या आठवडाभराचे काम शिल्लक असतानाच कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे काम रखडले आहे.