राजीवड्यात नागरिकाकांकडून नियमांचे उल्लंघन

रत्नागिरी :-कोरोना रुग्ण सापडूनही राजीवडा परिसरातील नागरिक गंभीर नसल्याची बाब समोर आली आहे. पोलीस यंत्रणा वारंवार सूचना देऊनही इथले नागरिक घराबाहेर फिरत आहेत, काहीजण मासेमारीसाठी समुद्रात जात आहेत. पोलिसांच्या सूचना न पाळल्या गेल्याने आता राजीवडा भागात सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहे. तसेच राजीवडा खाडीमध्ये गस्त देखील घालण्यात येणार आहे.

दिल्लीतील मरकज येथे जाऊन आलेली व्यक्ती कोरोना बाधित आढळल्याने राजीवडा भाग पुर्णतः बंद करण्यात आला आहे. येथील नागरिकांना आवश्यक असणाऱ्या जीवनावश्यक वस्तू, दूध, सिलेंडर, भाजीपाला उपलब्ध होईल याकडे प्रशासनाने लक्ष दिले आहे.

प्रशासनाकडून कोरोना बाबत जनजागृती करूनही राजीवाडा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावरून फिरताना दिसत आहेत. वारंवार सूचना देऊनही प्रशासनाच्या सूचना पायदळी तुडवला जात आहेत. या भागात पोलिसांची २४तास गस्त चालू आहे. मात्र पोलिसांची पाठ वळल्यावर अनेक तरुण महिलावर्ग रस्त्यावर गल्लीमध्ये उभे राहून गटागटाने चर्चा करताना दिसून येत आहेत. त्यामुळे धोका अधिक वाढण्याची शक्यता आहे. अशानं ऐकणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांनी आता सीसीटीव्हीची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. राजीवडा पुलापासून कॅमेरे बसविले जाणार आहेत. आठ ते दहा कॅमेरे राजीवाडा परिसरावर नजर ठेवणार आहेत. येथील जेट्यांवरही नजर ठेवली जाणार आहे.

राजीवडा परिसर सील केल्यामुळे नागरिक घरांमध्येच आहेत. त्यामुळे अनेक जण खाडीमध्ये मासेमारी करायला जाताना दिसताहेत. या नागरिकांवर आता पोलिसांची नजर राहणार आहे. राजिवडा ते सोमेश्वर पर्यंत खाडीमध्ये बंदोबस्त असणार आहे.

पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी राजीवडा परिसराची पाहणी करून कोणकोणत्या भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवायचे हे निश्चित केले आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत हे कॅमेरे बसून राजीवडा परिसरावर नजर ठेवली जाणार आहे.