रत्नागिरी:-कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावागावात चांगल्याप्रकारे प्रबोधन झाले असून जिल्ह्यातील ग्रामीण भागात मुंबई, पुण्यासह परजिल्ह्यातून आलेल्यांना आधी क्वारंटाईन व्हा मगच गावातील घरात या अशा सुचना गावकरी देत आहेत. गेल्या आठ दिवसात त्याचा अनुभव ग्रामीण भागात यंत्रणा राबविणार्या प्रशासकीय अधिकार्यांना येत आहेत.
रत्नागिरीचे कनेक्शन मुंबई, पुण्यामध्ये अधिक आहे. याच जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्याप्रमाणात आढळत आहेत. परदेशातून आलेल्या लोकांकडून या रोगाचा प्रादुर्भाव भारतात झाला. ते रुग्ण इतर लोकांमध्ये जात असल्यामुळे रुग्णांची साखळी वाढू लागली आहे. ती तोडण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय शासनाने घेतला. गावागावामध्ये याचा प्रसार करण्यासाठी गावस्तरावर ग्रामकृतीदलाची स्थापना केली. त्यामध्ये सरपंचांसह ग्रामसेवक, आरोग्यसेवक, पोलिस पाटील यांची नेमणुक करण्यात आली होती. गेल्या चौदा दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील विविध गावांमध्ये आलेल्या चाकरमान्यांना वेशीवरच रोखले जात आहेत. परजिल्ह्यातून कोणी आलाच तर त्याची माहिती गावातील लोकं दुरध्वनी करुन ती माहिती प्रशासनाला देत आहेत. त्यामुळे अधिकार्यांना संबंधित लोकांना क्वारंटाईन करणे शक्य झाले आहे. जिल्हा परिषद ग्रामविकास विभागाचे अधिकारी दिवसाला सव्वाशे फोन करुन संबंधित गावातील यंत्रणा कशी सुरु आहे, याची माहिती घेत आहेत.
परगावातून कुणी आलाच असेल तर त्याला आधी क्वारंनटाईनची व्यवस्था केलेल्या गावातील शाळेत, आरोग्य केंद्रात किंवा खासगी घरातील ठिकाणी पाठविले जाते. चौदा दिवस क्वारंटाईन केल्याशिवाय गावातील त्याच्या घरीही पाठविले जात नाही. या प्रकारच्या सुमारे चार ते पाच केसेस अनुभवायला मिळाल्याचे अधिकार्यांकडून सांगण्यात आले. यावरुन गावागावात प्रबोधन चांगल्याप्रकारे झाल्याचे दिसून येत आहे. एका वाडीतून थेट फोन आला आणि परजिल्ह्यातून आलेल्या व्यक्तीला क्वारंटाईन करण्यात आले. तसेच क्वारंटाईनचा शिक्का मारलेला कोणी बाहेर फिरणार्यांवर ग्रामस्थच वॉच ठेवत आहेत. प्रत्येक गावात एका गाडीची व्यवस्था करुन त्याद्वारे औषधे, भाजीपाला किंवा रुग्णांना वैद्यकीय सेवेसाठी आणले जात आहे.