रत्नागिरी:-कोकणी आंबा बागायतदार शेतकरी उध्वस्त होणार असून भविष्यात त्यांच्याही कुटुंबावर उपसमारीचे संकट येऊ शकते. या सर्व गोष्टींचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांनी बळीराजाला योग्य तो न्याय द्यावा अशी मागणी एका निवेदनाद्वारे आंबा बागायतदार राजेंद्र कदम यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
आंबा बागायतदाराची व्यथा सांगणारे निवेदन जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात आले आहे. जून 2019 पासून बागायतीमधील पिकाचे उत्पन्न येण्यासाठी खते, बागा साफसफई त्याचप्रमाणे झाडाची पालवी ते मोहरापासून फळ उत्पादित करण्याच्या कालावधीत फवारणी कीटकनाशके यांचा वापर करून पीक वाचविले आहे. अनेक किड व रोगांपासून संरक्षण करण्यासाठी कृषी विभागाच्या सल्ल्याप्रमाणे अतोनात प्रयत्न व खर्च केले आहेत. पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री, स्थानिक लोक प्रतिनिधी व जिल्हाधिकारी यांच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन आंबा बागायतदार करत आहेत. सध्या आंबा पीक नाशिवंत असल्यामुळे ते पूर्णपणे फुकट जाण्याच्या मार्गावर आहे.’ ग्राहक वर्ग मिळण्याची शक्यता नगण्य असल्याने खर्चाच्या मनाने
मिळणारे उत्पन्न न परवडणारे आहे. आर्थिक संकट निर्माण झाले असून शेतीपिकाशी निगडित कामगार वर्गाच्या कुटुंबावरही उपासमारीची वेळ येणार आहे.
शासनामार्फत फळे काढणीसाठी पाच कामगार वाहतूकीला पास दिले आहेत. रेल्वे वाहतूक निर्यात मार्ग बाजार समितीमार्फत आंबा विक्रीसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. या सर्वाचा आंबा बागायतदार व्यावसायिक यांना कोणताही उपयोग होणार नाही. जोपर्यंत लॉकडाऊन सारखी स्थिती महाराष्ट्र, भारत, आयाती देशात सुरु आहे, तोपर्यंत ग्राहकच उपलब्ध होणार नाहीत. बाजारसमितीमधील विक्रेता व्यापारी वर्ग हा देखील ग्राहक नसल्यामुळे आंबा जास्त प्रमाणात मागवत नाही. सध्या शेतकर्यावर मोठे संकट आले असून कोरोनापासून वाचण्यासाठी सर्व जनता आपापल्या घरीच आहे. या परिस्थितीमुळे ग्राहक वर्ग उपलब्ध नाही. शासनाने हमी भाव देऊन शेतकर्याचा माल खरेदी करावा. यावर्षीचे संपूर्ण शंभर टक्के आंबा पिक धोक्यात आले आहे. नेपाळी कामगार व स्थानिक कामगार यांना काय मोबदला द्यायचा हा मोठा प्रश्न बागायतदार व व्यापारी यांच्यासमोर येऊन ठेपला आहे.