रत्नागिरी:-हापूसच्या निर्यातीला चालना देण्यासाठी गेले काही दिवस पणन, कृषी विभागाकडून सुरु असलेल्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले आहे. मुंबईतील वाशी मार्केटमधील पाच कंटेनरमधुन सुमारे 105 मेट्रीक टन हापूस समुद्रमार्गे संयुक्त अरब अमिराती आणि ओमानला रवाना झाला आहे. आंबा बागयातदारांसाठी ही दिलासादायक गोष्ट ठरली आहे.
समुद्रमार्गे शुक्रवारी (ता. 4) पाच कंटेनर मुंबईतून
रवाना झाले. त्यातील चार कंटेनर संयुक्त अरब अमिरातीला तर एक कंटेनर ओमानला जाणार आहे. या दोन्ही देशांना पुरवण्यात आलेला माल निर्यातदारांमार्फत पाठविला गेल्याचे पणन मंडळाकडून सांगण्यात आले. एकूण 105 मेट्रीकटन आंब्याची निर्यात सुरु झाल्यामुळे वाशीत साठा होणार नाही. निर्यातीला झालेली सुरवात आंबा बागायतदारांना दिलासा देणारी ठरु शकते. 12 एप्रिलनंतर मोठ्याप्रमाणात आंबा दाखल होणार आहे. सध्या मालाला ग्राहक नसल्यामुळे दर पडलेले आहेत. पाचशे रुपयांपासून ते दोन हजार रुपयांपर्यंत पेटीला मिळत आहेत.
निर्यातीला पाठवलेल्या आंब्यालाही माफक दर मिळाला आहे.