रत्नागिरी:-कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन केल्याने हापूसला ग्राहकांची वानवा आहे. त्यातून बागायतदारांना दिलासा मिळवून देण्यासाठी ‘आत्मा’विभागाने बागेतून काढलेला आंबा थेट ग्राहकांच्या घरी पोचवण्यास सुरवात केली आहे. कोणत्याही केमिकलचा वापर न करता तयार झालेला आंबा कराड, सातारा, बारामतीकरांच्या घरी पोचला आहे. कराडमधून चांगला प्रतिसादही मिळत आहे.
‘आत्मा’चे प्रकल्प संचालक जी. बी. काळे यांनी आंबा बागायतदारांना दिलासा देण्यासाठी हापूसची थेट विक्री करण्यासाठी पावले उचलली होती. कराडसह विविध भागातील कृषी क्षेत्रातील लोकांशी संपर्क साधून हापूस विक्रीसाठी प्रयत्न करण्याची विनंती केली होती. त्यातूनच कराडमधील सुनिलदत्त शिंदे यांनी पावले उचलली. मित्र, नातेवाईक, शेजारी यांना आंबे हवेत का, असे विचारणा केली. काहींना आंब्याचे फोटोही व्हॉटस्अॅपवरुन पाठविले. त्यानंतर एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 25 पेटी आंब्याची ऑर्डर मिळाली. शिंदे यांनी तशी मागणी श्री. काळे यांना कळवली. त्या पेट्या संबंधित लोकांच्या घरपोच करण्यात आल्या. ही माहिती त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना मिळाल्यानंतर लगेचच अन्य काही लोकांनी शिंदे यांच्याशी संपर्क करुन आणखी 25 पेटी आंबा पाहीले असल्याचे नुकतेच कळवले आहे. याच पध्दतीने सातारा, कोल्हापूर, बारामतीमध्येही आंब्याची विक्री करण्यात येत आहे. पहिल्याच दिवशी 140 पेटी तर दुसर्या टप्प्यात 440 पेटी कराड, बारामतीला रवाना झालेल्या आहेत.
आंबा काढल्यानंतर बहुतांशवेळी तो केमिकलयुक्त पाण्यातून किंवा पेटीमध्ये औषध ठेवून पिकवला जाण्याची शक्यता असते. यंदा ग्राहकच नसल्यामुळे मोठ्याप्रमाणात आंबा काढणी झालेली नाही. तरीही डझनचा दर हा अत्यंत कमीच आहे. यंदा निसर्गातील बदलांच्या परिणामामुळे आंबा हंगाम दोन महिने लांबला आहे. 15 एप्रिलनंतर खर्या अर्थाने पेट्या रवाना होणार आहे; परंतु पहिल्या टप्प्यात तयार होऊ लागलेल्या आंब्याचा थेट ग्राहकांपर्यंत पोचवण्याची ही साखळी ना नफा ना तोटा तत्त्वावर बागायतदारांच्या पथ्थ्यावर पडणार आहे.