गर्दी नियंत्रणासाठी कारवाईचा बडगा; थेट गुन्हे दाखल

रत्नागिरी:-जिल्ह्यात दुसरा पॉझिटीव्ह रुग्ण सापडल्यानंतर पोलिस प्रशासनाने गर्दी नियंत्रणासाठी कारवाईचा बडगा उगारला आहे. राजीवडा येथे आरोग्य सर्वेक्षणाच्या कामात अडथळा आणणार्‍या माजी नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल केला. तर नवा फणसोप येथेही जमाव बंदीचे उल्लंघन करणार्‍यांविरोधात गुन्हा दाखल करुन एकाला अटक केली आहे.
राजीवडा येथे दिल्लीतील तबलिंगीच्या कार्यक्रमाला हजेरी लावून आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आले. त्यानंतर सतर्क झालेल्या प्रशासनाकडून राजीवडा परिसरात आरोग्य यंत्रणेमार्फत सर्व्हेक्षण सुरु केले. वर्षा अविनाश पवार (वय 31, तांबट आळी, रत्नागिरी) या आरोग्य विभागातर्फे राजिवडा येथे सर्वे करत होते. त्या कर्मचार्‍याला माजी नगरसेवक बिजली खान (रा. राजिवडा) यांनी रोखले. हा प्रकार शनिवारी (ता. 4) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडला. या प्रकरणी पवार यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून बिजली खानविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकार्‍यांनी जमावबंदीचे आदेश काढले आहेत. नवा फणसोप येथेही काही लोक जमाव करुन होते. मोसिन होडेकर, हमीद पावसकर, याकूब होडेकर, मकबुल दाऊद फणसोपकर, इम्रान अहमद सोलकर (रा. नवा फणसोप) व गफुर पटेल, फैरोज होडेकर, इकलाक होडेकर सोबत दहा ते बारा महिला पुरुष शुक्रवारी (ता. 3) सायंकाळी साडेचारच्या सुमारास एकत्र होते. तसेच पोलिस पाटील शादाब अब्दूल मज्जीद मुकादम (वय 37, जुना फणसोप, रत्नागिरी) यांनी त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्नही केला; परंतु जमावाने पोलिस पाटीलांना रोखले. जमावातील काहींनी त्या पोलिसपाटलांना धक्काबुक्की केली. हा प्रकार नवा फणसोप येथील उर्दू शाळेसमोर घडला. यातील इम्रान याला अटक केली आहे. या प्रकारामुळे तिव्र नाराजी व्यक्त केली जात असून या प्रकरणी मुकादम यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरुन पोलिसांनी संशयित जमावाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सकपाळ करत आहेत.