लांजा:- धार्मिक विधींसह मनोरंजनात्मक कार्यक्रमांनी साजरा होणार्या हनुमान जयंती उत्सव कोरोना विषाणुचा भारतात संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आल्याने उत्सवावर मर्यादा आल्या असून जयंती उत्सव साध्या पध्दतीने साजरे केले जाणार आहेत. त्यामुळे भक्तांचा हिरमोड झाला आहे. तरी अश्या बिकट परिस्थिती हिरमसून न जाता यातुन ही काही चांगले घडविण्याच्या उद्देशाने समाजिक बांधिलकी जपत श्री जय हनुमान सेवा मंडळ, रिंगणे मुंबई व रेडक्रॉस ब्लड बॅक रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ६ एप्रिल रोजी जि. प. प्राथमिक शाळा नं ३ रिंगणे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. संकलित होणारे रक्त गरजुंना दिले जाणार आहे.
जगभरात कोरोना या संसर्ग जन्य विषाणुने हाहाकार माजवला असुन अनेक देशातील हजारो नागरिक मृत्यु पावले आहेत. एका माणसाकडून दुसर्या माणसा मध्ये या विषाणुचा संसर्ग होत असल्याने दिवसागणिक नव- नविन रुग्न समोर येत आहेत. संसर्ग टाळण्यासाठी जगभरातील अनेक देशांनी लॉकडाऊन केले आहे. भारतात ही तब्बल २१ दिवस लॉकडाऊन करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे लोक घरात बंदिस्त झाले असुन दैनंदिन जिवन स्तब्ध झाले आहे. २१ दिवसांच्या लॉकडाऊनच्या कालावधीत हिंदु धर्मातील श्री राम व हनुमान या देवतांचे जन्म दिवस येत आहेत. या देवतांच्या मंदीरां मध्ये जन्म दिवसाचे औचित्य साधुन जयंती उत्सवाचे आयोजन करुन धार्मिक, मनोरंजनात्मक कार्यक्रमासह साजरे करण्याची एक रित प्रचलित झाली आहे. लॉकडाऊनमुळे उत्सवावर ही मर्यादा आल्या असुन जयंती उत्सव साध्या पध्दतीने केवळ धार्मिक विधींनी साजरा करण्याचे शासनाने आदेश दिले आहेत. मनोरंजनात्मक कार्यक्रमांवर पुर्णत बंदी आली असल्याने भक्तांचा हिरमोड झाला असला तरी यातुन ही काही चांगले करण्यासाठी व सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी मंडळाकडुन रक्तदान शिबिर सारखे समाज उपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
हनुमान सेवा मंडळ, रिंगणे. मुंबई या मंडळाच्यावतीने दरवर्षी मोठ्या उत्साहात हनुमान जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी कोरोना विषाणुचा संसर्ग टाळण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे उत्सवावर मर्यादा आल्या आहेत. मनोरंजनात्मक कार्यक्रम करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे पारंपरिक पध्दती उत्सव साजरा करण्या व्यतिरिक्त समाज उपयोगी असे काही करु शकतो का? याची चाचपणी मंडळाकडुन केली जात होती. अखेर रक्तदान शिबिर आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले. या शिबिराच्या माध्यमातून रक्त संकलित करुन ते गरजु पर्यत पोहचविण्याचा मंडळाचा मानस आहे. शिबिर हनुमान सेवा मंडळ व रेडक्रॉस रत्नागिरी या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे. ६ एप्रिल रोजी जि. प. प्राथमिक शाळा नं ३ रिंगणे येथे आयोजित रक्तदान शिबीरा मध्ये रिंगणे पंचक्रोशीतील दात्यानी मोठ्या संख्येने येऊन रक्तदान करण्याचे आव्हाहन मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.
दरम्यान, शिबिराच्या आयोजनासाठी मंडळाचे अध्यक्ष विलास पेडणेकर (मुंबई)), सुनिल पेडणेकर (स्थानिक) सरचिटणीस विश्वनाथ पेडणेकर (मुंबई), मिलिंद पेडणेकर (स्थानिक) यांच्या मार्गदर्शनाखाली पराग पेडणेकर, प्रितेश बारे, सचिन लाड, भुषण सरफरे, अमर आयरे, अनिरुद्ध पेडणेकर, सर्वेश पेडणेकर, गणेश पेडणेकर, माणिक पेडणेकर, पांडुरंग पेडणेकर, सचिन आयरे हे मेहनत घेत आहेत.