पोलिसांनी दाखवला खाक्या; राजीवड्यात माजी नगरसेवक ताब्यात

रत्नागिरी:-राजिवडा येथे कोरोना बाधित रुग्ण सापडताच राजिवडा परिसर सील करण्यात आला आहे. आज सकाळपासून आरोग्य खात्याने येथील सर्व नागरिकांची तपासणी करण्यासाठी आशा वर्कर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची टीम पाठवली आहे. या आरोग्य कर्मचाऱ्यांना येथे तपासणी करण्यासाठी एका माजी नगरसेवकाने अटकाव केला.

येथे तपासणीसाठी आलात तर येथील माहोल बिघडविण अशी धमकी देखील दिली. यानंतर हि सर्व पथके पुन्हा परत आली. यावर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांनी कणखर भूमिका घेत राजिवडा गाठले व येथील जनतेला पुन्हा एकदा आवाहान केले. आरोग्य पथकांना अटकाव करणाऱ्या माजी नगरसेवकाची पोलिसी भाषेत चांगली कानउघाडणी करीत या माजी नगरसेवकाला व एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेचे चोरून व्हिडीओ शुटींग करणाऱ्याला चांगलाच प्रसाद देण्यात आला.

राजिवडा परिसर सील केला आहे. रत्नागिरी शहरातील पन्नास टक्के भागातही आम्ही याची कडक अमलबजावणी करणार आहोत. मरकजमधून कोणी आले असेल तर ती माहिती तात्काळ कळवा. तस केलं नाही आणि कोणी पॉजिटीव्ह आढळून आला तर संबंधितांवर आणि माहिती लपवणाऱ्यावर कडक कारवाई केली जाईल. लोकांनी पॅनिक होण्याची गरज नाही. जीवनावश्यक वस्तू ची व्यवस्था केली जाणार आहे. सध्या एक रुग्ण आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र यावेळी कडक भूमिका घेणार आहे, असे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सांगितले.

अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, शहर पोलीस निरीक्षक अनिल लाड या सर्वांनी पुन्हा एकदा नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहान केले आहे.या भागातील जनतेला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मिश्रा यांनी केले आहे.