रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात कोरोनाला आळा बसावा यासाठी नगराध्यक्ष प्रदिप उर्फ बंड्या साळवी आणि रनप प्रशासन सर्वतोपरी झटत आहे. युद्ध पातळीवर निर्णय घेऊन केलेल्या कामांमुळ्ये शहरात कोरोनाचा फैलाव मर्यादित राहीला आहे. रस्त्यांवर केलेली निर्जंतुकीकरण मोहीम, गटारांची स्वच्छता आणि गर्दी कमी करण्यासाठी वार्डा वार्डात सुरू केलेली भाजी विक्री केंद्र याचा सकारात्मक परिणाम शहरात दिसून आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
कोरोनाने राज्यात शिरकाव करताच नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी नगर परिषदेच्या आरोग्य यंत्रणेला अलर्ट राहण्याच्या सूचना केल्या. नगर परिषदेतील विभागनिहाय अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत नगर परिषद रुग्णालयात औषधांचा असलेला साठा, तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या यांची माहिती घेऊन आवश्यक त्या सूचना केल्या. ज्या रुग्णालयात औषधांचा साठा संपला होता त्या ठिकाणी औषधांचा साठा उपलब्ध करून दिला. गुहागर येथे कोरोनाचा पहिला रुग्ण सापडताच नगराध्यक्ष साळवी यांनी गर्दीची ठिकाणे बंद करण्याचा तातडीने निर्णय घेतला. तसेच भाजी आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी होऊन सोशल डिस्टनसिंग नियमांचे उल्लंनघन होऊ नये यासाठी प्रत्येक वार्डात भाजी दुकाने सुरू केली.
कोरोनाचा शिरकाव शहरात होऊ नये यासाठी नगराध्यक्ष साळवी यांनी शहरातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवर फवारणी करून निर्जंतुकीकरण केले. आरोग्य विभागातील सफाई कर्मचारी याना मास्क, सॅनिटायझर उपलब्ध करून दिले. शहरवासीयांबद्दल असलेली आपुलकी आणि प्रेम यासाठी नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी अहोरात्र काम करून शहराला कोरोनासारख्या महाभयंकर रोगापासून दूर ठेवले.