रत्नागिरी:- लॉकडॉऊनमुळे अनेकजण घरातूनच काम करत आहेत. त्याचबरोबर जनताही घरातच थांबून आहे. या सर्वांची गैरसोय होऊ नये यासाठी महावितरणकडून अखंडीत वीजपुरवठा करण्यात येत आहे. रत्नागिरी तालुक्यात महावितरणचे 239 कर्मचारी कार्यरत असून, जनतेला अखंडीत वीज पुरवठा करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत.
रत्नागिरी तालुक्यात 17 अभियंते, 156 तांत्रिक कर्मचारी व 66 बहिस्थ कर्मचारी कार्यरत आहेत. लॉकडाऊन संपेपर्यंत तालुक्यातील जनतेला त्रास होऊ नये यासाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याच्या सुचनेनुसार कर्मचारी अधिकारी सेवा बजावित आहेत. सध्या मीटर रीडिंग बंद असून, वीजवसूली देखील थांबविण्यात आली आहे. त्यामुळे अखंडित वीजपुरवठा देण्याकडे विद्युत कर्मचारी, अधिकार्यांनी लक्ष केंद्रित केले आहे.
महावितरणकडून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कर्मचारी अधिकारी यांना सॅनिटायझर, मास्कची उपलब्धता करून दिली आहे. शिवाय कामावेळी सुरक्षित अंतर ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. प्रशासकीय सेवेतील कर्मचारी, अधिकार्यांना कार्यालयीन कामासाठी कार्यालयातून गर्दी होणार नाही, याची सूचना केली होती. त्यानुसार पाच टक्के उपस्थितीचा निकष राखूनच कर्मचारी, अधिकारी कार्यरत आहेत.