हापूसच्या वाहतुकीसाठी ‘आत्मा’ विभाग सरसावला

रत्नागिरी:- ऐन हंगामात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बाजारपेठांमधील कामकाज थांबले आहे. त्याचा परिणाम हापूसवर होत असून त्यातून आंबा बागायतदारांना दिलासा देण्यासाठी ‘आत्मा’ विभाग सरसावला आहे. रत्नागिरीतील बागायतदारांच्या पेट्या थेट सातारा, कराड, कोल्हापूर, पुणे येथील ग्राहकांकडे पाठविण्यासाठी पावले उचलली आहे. पहिल्याच टप्प्यात 140 पेट्यांची गाडी कराडला रवाना होत आहे.
मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोनाचे रुग्ण भारतासह महाराष्ट्रात आढळू लागले. त्यानंतर हळूहळू लॉकडाऊनला सुरवात झाली. संपूर्ण देश ठप्प झाला असून नागरिक घराबाहेर पडत नाहीत. जीवनावश्यक वस्तूंसह फळे, भाजीपाला विक्रीसाठी परवानगी आहे; मात्र ग्राहकांची कमतरता जाणवत आहे. त्याचा परिणाम हापूसवर होत आहे. वाशीतील व्यापार्‍यांनी हात झटकल्यामुळे कोकणातील बागायतदार हतबल झाले. पिक येण्यासाठी लाखो रुपये खर्च करुन बसलेल्या बागायतदारांना दिलासा देण्यासाठी पणन, कृषी विभागाकडून प्रयत्न सुरु आहे. आत्मा विभागाकडून रत्नागिरीतील बागायतदारांसाठी शक्कल लढवली आहे. त्या-त्या जिल्ह्यातील आत्मा विभागाच्या अधिकार्‍यांचे सहकार्य घेऊन आंब्याची थेट विक्री केली जात आहे. कोल्हापूर, कराड, बारामती, पुणे येथील शेतकरी गट, गृहनिर्माण सोसायटी यांच्याशी संपर्क साधून आंबा विक्रीची थेट साखळी तयार केली जात आहे. कराड येथील एका गटाने आंबा घेण्याची तयारी दर्शविली होती. त्यानुसार रत्नागिरीतील बागायतदारांना आत्माकडून आवाहन करण्यात आले होते. जागेवर चार डझनची पेटी घेऊन ती कराडला पाठविण्यात येणार आहे. शुक्रवारी (ता. 3) सायंकाळी ही गाडी कराडला रवाना होणार आहे. आंबा घेतल्यानंतर संबंधित विक्रेत्याकडून त्याचे पैसे
बागायतदाराला बँकिंग प्रणालीने जमा केले जाणार आहेत. पेट्या बागायतदरांच्या थेट बागेतूनच उचलण्यात येणार आहे. त्यासाठी वाहतूकीचा खर्च बागायतदाराला करावा लागणार नाही. तसेच गृहनिर्माण सोसायटींशी चर्चा करुन त्यांच्या दारात आंबा आणून देण्यासाठी आत्माकडून प्रयत्न सुरु आहेत. त्याला यश आले तर रत्नागिरीतील बागायतदारांचा आंबा किमान दरात लोकांच्या घरात जाणार आहे. यंदाच्या परिस्थितीत झालेला खर्च भरुन काढण्याचे आव्हान बागायतदारापुढे आहे.
ग्राहक नसल्यामुळे मोठ्या शहरातील व्यापार्‍यांनी आंबा विक्रीसाठी हात वर केल्याने बागायतदारांचा हिरमोड झाला आहे. सध्या आंबा विक्रीला काढला गेला, तरीही त्याला दर कवडीमोलाचाच मिळण्याची भिती बागायतदारांकडून व्यक्त होत आहे. बाजारात डझनला तीनशे रुपयांपर्यंत दराची मागणी होत आहे.