हापूस वाहतुकीतील अडचणी सोडवा- अ‍ॅड. पटवर्धन

रत्नागिरी:- कोकणातील अर्थकारण अवलंबून असलेल्या हापूसच्या विक्रीसाठी शासनाकडून पावले उचलणे गरजेचे आहे. आंबा नाशिवंत असल्यामुळे तत्काळ वितरण न झाल्यास व्यावसायिक अडचणीत येतील. तसेच व्यावसायिकांना मुंबई, पुण्यात आंबा पाठविताना अनेक अडचणी येत असून त्यावर योग्य ते नियोजन करण्याची गरज आहे, असे निवेदन भाजप जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दिपक पटवर्धन यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिले.
रत्नागिरीत आता आंबा, काजू, फणस या पिकांचा हंगाम आहे. कोकणाचे अर्थकारण या पिकांवर विसंबून आहे. ही फळे नाशिवंत आहेत. या फळांचे मार्केटिंग, वाहतूक याबाबत काही निर्णय तात्काळ करण्याची गरज आहे.
आंबा उत्पादक, व्यापारी यांना वाहतूक परवाना हा अडचणीचा विषय झाला होता. ऑनलाईन परवाने मागणीचे अर्ज मोठ्याप्रमाणात प्रलंबित होते. जिल्हा पोलीस अधिक्षकांनी वाहतुकीसाठी परवान्याची गरज नाही, असे प्रसिद्धीपत्रक काढले आहे. मात्र याबाबत स्पष्ट खुलासा होणे आवश्यक आहे. कारण आंबा ट्रकमध्ये भरून रवाना झाला आणि मध्येच परवाना नाही म्हणून अडकून पडला तर हे नाशिवंत फळ असल्यामुळे फुकट जाईल. त्याचा फटका व्यापार्‍यांना किंवा उत्पादकांना बसणार आहे.
येथील अर्थकारण आंबा व मच्छीवर विसंबून आहे. आंबा व्यावसायिकांना वेगवेगळ्या शहरांमध्ये आंबा विक्री व्यवस्था निर्माण करून देण्यासाठी शासकीयस्तरावर निर्णय करण्यासाठी शिफारस करणे गरजेचे आहे. बाजार समित्यांमध्ये खुप गर्दी आहे. आंब्याचे ट्रक फार संख्येने घेतले जात नाहीत, अशा स्थितीत येथिल आंबा फळासाठी मोठ्या शहरांमध्ये स्वतंत्र व्यवस्था करून त्या जागेवर तात्पुरते मार्केट उभारण्यात यावीत अशी मागणी शासनस्तरावर करीत आहोत.

चौकट

जीवनावश्यक वस्तू पुरवठ्यात अडथळा

रत्नागिरी शहरी भागात जीवनावश्यक वस्तू पुरवठा बर्‍यापैकी होत आहे; मात्र ग्रामीण भागात गॅस सिलेंडर तसेच अन्नधान्य याबाबत अडचणी आहेत. गॅस सिलेंडरचा पुरवठा होत नाही, अशी तक्रार लांजा तालुक्यातून येत आहे. गावातील किराणा दुकानात माल संपला असून त्यांनाही नवीन माल प्राप्त होत नाही. शेतीची कामे सुरु आहेत. पिकावर फवारणी तसेच अन्य कामासाठी वापरण्यात येणारी अवजारेही डिझेलवर चालतात. त्यांना इंधन पुरवठ्यात अडचणी येत आहेत. रेशनवर तीन महिन्याचे धान्य मिळणार अशी परिपत्रक फिरत असली तरीही रास्त दर दुकानात धान्य नाही, याकडे अ‍ॅड. पटवर्धन यांनी लक्ष वेधले.