मिऱ्यावर सापडला सोमेश्वर मधील प्रौढाचा मृतदेह 

रत्नागिरी:-जाकिमिर्‍या येथील खाजणात कालवे काढण्याकरिता गेलेल्या सोमेश्‍वर येथील प्रौढाचा मृतदेह खाडीकिनारी वाळूत सापडला. गुरूवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार समोर आला.
सोमेश्‍वर-मुस्लिमवाडी येथील नौशाद अब्दुल लतीफ हुशे (वय ४८) हे गुरूवारी आपल्या ताब्यातील दुचाकी घेऊन जाकिमिर्‍या येथे कालवे काढण्यासाठी गेले होते. दुपारच्या सुमारास जाकिमिर्‍या खाजणात त्यांचा मृतदेह मिळून आला. हा घातपात की आत्महत्या? अशा चर्चा रंगू लागल्या. याबाबतची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली. या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
नौशाद हे सोमेश्‍वर-मुस्लिमवाडी येथील रहिवाशी असून त्यांच्या गळ्यात टाटा मेमोरिअल हॉस्पिटलचे कॅन्सर रूग्ण असल्याचे ओळखपत्र होते. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आला. नौशाद यांचा मृत्यू हृदयविकाराने झाला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.