रत्नागिरी:-दिल्लीनजिकच्या हजरत निजामुद्दीन येथे मरकतला गेलेल्या रत्नागिरी शहरातील चौघांना जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या नातेवाईकांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. चौघांच्या थुंकी, स्वाबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. जिल्हा शासकीय रूग्णालयात एकूण १८ रूग्ण असून त्यापैकी सहा जणांचे नमुने निगेटीव्ह आले आहेत. त्यामध्ये दिल्लीहून आलेल्या एकाचा समावेश आहे. सहा जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक बोल्डे यांनी दिली.
दिल्लीतील हजरत निजामुद्दीन येथे १ हजार ७०० लोक मेळाव्यासाठी एकत्र आले होते. त्यामध्ये रत्नागिरीतील ८ ते १० जणांचा समावेश होता. त्यापैकी 3 जण यापूर्वीच सापडले. यातील एक जण यापूर्वीच जिल्हा रुग्णालयात, 1 मुंबई तर एकजण आग्रा येथील रुग्णालयात उपचार घेत आहे. आता रत्नागिरीत चौघांना शोधण्यात पोलीस प्रशासनाला यश आले आहे. परंतु नागरिकांकडून पोलिसांना सहकार्य मिळत नाही. दिल्लीला गेल्याची माहिती लपविली जात असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. तरीही राज्यस्तरीय मिळालेल्या माहितीच्या आधारे चौघांना रूग्णालयात दाखल केले आहे. जिल्हा शासकीय रूग्णालयात बऱ्या झालेल्या पॉझिटीव्ह रूग्णासह एकूण १८ जण उपचार घेत आहेत. १७ पैकी ६ जणांचे नमुने निगेटीव्ह आले आहेत. सहा अहवाल प्रलंबित आहेत. बुधवार, गुरूवारी नव्याने दाखल झालेल्या पाच रूग्णांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत. नव्या रूग्णांना सध्या कोरोनाची लक्षणे दिसत नाहीत. परंतु दक्षता म्हणून त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे नमुने पाठविण्यात येणार आहे.