गाव गाठण्यासाठी त्यांनी केला चक्क रेल्वे रुळावरून पायी प्रवास.

रत्नागिरी:- मुंबईतून कोकणात आपल्या मुळ गावी येण्यासाठी सुमारे 25 चाकरमान्यानी कोकण रेल्वेच्या रूळावरून पायी चालत खेडपर्यंत येत असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर खेड प्रशासनाने त्यांना ताब्यात घेवून त्यांची व्यवस्था तालुका बंदीस्त क्रिडासंकुलात केली आहे.

याबात अधिक माहिती अशी. संपूर्ण देशात तसेच राज्यात संचारबंदी केल्यानंतर मुंबईतील अनेक चाकरमान्यांचा मुंबईत राहण्याचा प्रश्‍न निर्माण झाला होता. रेल्वे तसेच अन्य प्रवासी वाहतूक बंद झाल्यामुळे जायचे कसे हा प्रश्‍न त्यांच्यापुढे होता. यावर त्यांनी पायी चालत जाण्याचा जीवघेणा पण तितकाच धाडसी निर्णय घेतला. चालत जायचे तर मुंबई गोवा महामार्गावर ठिकठिकाणी पोलिसांनी रस्ते अडवले होते. मग कोकणात जायचे कसे? यावर त्यांनी चक्क कोकण रेल्वेच्या रूळावरून जाण्याचा पर्याय निवडला. दिवा ते खेड असा त्यांनी पायी प्रवास केला. वाटेत ठिकठिकाणी मुक्कामही केला. रेल्वे रूळावरून जाताना त्यांना कोणीही अडवले नाही. पण आज खेड जवळील खवटी रेल्वे स्टेशन जवळ हे चाकरमानी जेवण बनवत असता पोलिसांनी त्यांना हटकले असता सर्व प्रकार उघड झाला. विशेष म्हणजे या लोकांकडे जेवण तयार करण्याचे सर्व साहित्य सोबत होते. गेले पाच दिवस मजल-दरमजल करत ते खेडमध्ये पोहोचले. रत्नागिरी जिल्ह्यात आल्यानंतर मात्र त्यांना पुढे जाण्यास जिल्हा प्रशासनाने बंदी केली. यात अनेक तरूण कांही महिलांचा समावेश आहे. अनेक जण उच्चशिक्षित अभियंते असून त्यांची राहण्याची तसेच जेवणाची व्यवस्था खेड नगपालिकेतर्फे तसेच तहसिल कार्यालयामार्फत केली आहे.

रायगड पोलिस तसेच कोकण रेल्वेच्या मार्गावरील एकाही स्टेशनवर 25जणांना का अडवण्यात आले नाही असा प्रश्‍न आता पुढे आला आहे. कोकण रेल्वे स्टेशनवरील सुरक्षिततेचा प्रश्‍न आता ऐरणीवर आला आहे.