८४ हजार उज्ज्वला लाभार्थींना तीन महिने मोफत सिलेंडर.

रत्नागिरी:-उज्ज्वला लाभार्थींना शासनाने तीन महिन्यांसाठी मोफत सिलिंडर देण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यात 84 हजार लाभार्थी असून त्यांना 1 एप्रिल ते 30 जून 2020 या कालावधीत सिलिंडर मोफत दिला जाणार आहे अशी माहिती जिल्हा समन्वयक गणेश कारवार यांनी दिली.
उज्ज्वला लाभार्थींना तीन महिन्यांसाठी मोफत सिलिंडर मिळणार आहे. भारत सरकारने पुढील तीन महिन्यांकरिता उज्वला योजना ग्राहकांना विनामूल्य रिफाईल जाहीर केले आहेत. याची अंमलबजावणी 1 एप्रिल ते 30 जून 2020 या कालावधीत देशभरातील आठ कोटी लाभार्थींना एलपीजी सिलिंडर मोफत दिले जाणार आहे. त्यानुसार प्रत्येक महिन्याला सिलिंडर घेतल्यानंतर त्याची रक्कम संबंधित ग्राहकाच्या खात्यात वर्ग केली जाणार आहे. शेवटचा रिफिल मिळाल्यानंतर 15 दिवसानंतरच लाभार्थी पुढील सिलिंडर आरक्षित करु शकेल. सिलिंडरचे आरक्षण आयव्हीआरएस किंवा नोंदणीकृत मोबाइल क्रमांकाद्वारे करणे आवश्यक आहे. रत्नागिरी जिल्ह्यात एलपीजीचे सुमारे 84 हजार ग्राहक आहेत. त्यांना उज्ज्वला योजनेचा लाभ दिला जाणार आहे. लॉकडाऊन कालावधीसाठी एलपीजी वितरकांमध्ये चांगला साठा आहे आणि त्यात कोणतीही कमतरता नाही. ग्राहकांनी घाबरू न जाता जादा साठा करण्याच्या उद्देशाने खरेदी करु नये. तसेच सिलिंडरसाठी वितरकांच्या शोरूम आणि गोदामांना भेट देऊ नका असे आवाहन वितरकांमार्फत करण्यात आले आहे. एसएमएस, व्हॉट्सअ‍ॅपद्वारे (आयओसी: 75888 88824, एचपी: 92222-01122) स्वत:च्या घरातून एलपीजी सिलिंडर बुक करता येणार आहे. कोरोनामुळे नोटांची अनावश्यक हाताळणी टाळण्यासाठी जिथे शक्य असेल तेथे डिजिटल पेमेंट करण्यास ग्राहकांना प्रोत्साहित केले जात आहे. एलपीजी सिलिंडरचा पुरवठा सर्व एलपीजी ग्राहकांना करत आहेत.

मृत्यू झाल्यास पाच लाख

एलपीजी शोरूम कर्मचारी, गोदाम-कीपर, एलपीजी मॅकेनिक आणि एलपीजी डिलिव्हरी बॉईज, रिटेल आउटलेट ग्राहक सेवा करणारे ओएमसी कर्मचारी, वाहन चालक हे आपले जीवन धोक्यात घालत आहेत. ग्राहक आणि इतर नागरिकांना इंधन वितरित करत आहेत. कठीण काळात सेवा बजावत आहेत. कार्यरत असलेल्या कोणत्याही कर्मचार्‍यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटूंबियांना पाच लाख रुपये देण्यात येणार असल्याचे शासनाने जाहीर केले आहे.