वैद्यकीय तपासणी सुरू
रत्नागिरी:-
निजामुद्दीन मरकज येथे जवळपास १७०० लोक धार्मिक कार्यासाठी जमले होते. त्यापैकी बरेच जण परदेशातून देखील आले होते ज्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. या लोकांच्या संपर्कात आल्यामुळे इतरांनाही कोरोनाची लागण झाली आहे. धक्कादायक म्हणजे या धार्मिक कार्यक्रमाला जिल्ह्यातील 8 ते 10 जण तर रत्नागिरी शहरातुन दोघेजण गेले होते.
या धार्मिक कार्यक्रमाला गेलेल्यांपैकी आतापर्यंत २४ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे आणि ३०० पेक्षा जास्त लोकांमध्ये कोरोनाची लक्षण दिसून आली आहेत. अनेक लोक येथून इतर राज्यात गेल्याची माहिती मिळत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातून याच कार्यक्रमासाठी गेलेल्या ८ ते १० जणांचा शोध पोलिसांकडून सुरु आहे. तर रत्नागिरी शहरातून या कार्यक्रमाला दोघांनी हजेरी लावली होती. रत्नागिरी शहरातील दोघे 7 तारीखला दिल्लीत निजामुद्दीन येथे पोहचले. 7 ते 10 मार्च पर्यंत हे दोघे मरकज येथे थांबले. 12 मार्चला ते दोघे दिल्लीतून अहमदनगर येथे आले. अहमदनगर येथून 13 मार्च ला हे दोघे रत्नागिरीत दाखल झाले.
या दोघांचा मंगळवारी शोध घेण्यात आला असून यांची वैद्यकीय तपासणी सुरू आहे. या दोघांसह इतर तालुक्यातील तहसीलदारांकडून पोलिसांच्या मदतीने या सगळ्यांचा शोध सुरु असून रत्नागिरीकरांसाठी हि गोष्ट चिंता वाढवणारी आहे.