जमावबंदीचे आदेश डावलल्यास गृहनिर्माण सोसायटीच्या पदाधिकार्‍यांवर गुन्हे.

रत्नागिरी:-संचारबंदीच्या काळात अनेक गृहनिर्माण सोसायट्यामध्ये बंदी आदेश पायदळी तुडविल्याचे दिसत आहे. काही लोक चकाट्या पिटण्यासाठी किंवा टाईंपाससाठी सोसायट्यामध्ये जमाव करीत आहेत. लहान मुलं देखील बिनधिक्कत वावरताना आहेत. बाहेरच्या व्यक्ती ये-जा करीत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या आहेत. त्यामुळे यापुढे कायद्याचे उल्लंघन केले आणि विनाकारण घराबाहेर पडल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितासह पदाधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करू, अशी सक्तीची ताकीद शहर पोलिसांनी गृहनिर्माण सोसायटीना दिली आहे.
पोलिस दलाने सर्व गृहनिर्माण सोसायटीच्या पदाधिकार्‍यांना पत्र दिले असून काहींना प्रत्येक्ष बोलावून सूचना केली आहे. बंदी आदेशाच्या काळात कोणीही घराबाहेर पडू नये. जीवनावश्यक वस्तू घराजवळील दुकानावरूनच घरपोच योजने अंतर्गत मागवाव्यात. लहान मुलांना घराबाहेर अजिबात सोडू नये. बाहेर कोठेही एकत्र गप्पाटप्पा मारत बसू नये. सर्वांनी आपली काळजी घ्या, कुटुंबाची काळजी घ्या,
शेजार्‍यांनी काळजी घ्या, देशाची काळजी आपोआप घेतली जाईल, असे सूचित केले आहे. संचारबंदीचे उल्लंघन करताना कोणी आढळल्यास त्याच्यासह सोसयाटीच्या पदाधिकारर्‍यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.