रत्नागिरी:- कोरोनामुळे लॉकडाऊन असताना जीवनावश्यक वस्तूंसाठी ग्राहकांची गैरसोय होवू नये यासाठी, जिल्हा प्रशासनाने भाजी विक्रीसाठी परवानगी दिली आहे. नाचणेतील आठवडाबाजार, शनिवार आठवडा बाजार परिसरात सुरक्षित अंतर ठेवून भाजी विक्री सुरू करण्यात आली आहे. शहरातील नाकानाक्यावरही भाजी विक्री करण्यात येत असतानाच एकाच ठिकाणी ग्राहकांची गर्दी होवू नये यासाठी प्रशासनाने गोगटे जोगळेकर महाविद्यालय व शिर्के हायस्कूलच्या पटांगणे ताब्यात घेतली आहे.
ग्राहकांना भाज्या वेळेवर उपलब्ध व्हाव्यात. शिवाय खरेदीवेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने गोगटे जोगळेकर मैदान व रा.भा.शिर्के प्रशालेचे मैदान ताब्यात घेतले असून स्थानिक जनतेच्या सोयीसाठी या मैदानावर सुरक्षित अंतर ठेवून भाजी विक्री सुरू करण्यात आली आहे. लवकरच या मैदानावर भाजी विक्री सुरू केली जाणार आहे.
दुचाकीवर बंदी असल्याने शहरातील नागरिकांना आता भाजी आणण्यासाठी चालत जावे लागणार आहे. आठवडाबाजार, नाचणे, मारूतीमंदिर येथे भाजी खरेदीसाठी जाणे शहरातील सर्वच ग्राहकांना शक्य नाही. त्यामुळे शहरामध्ये ठिकठिकाणी भाजी विक्री झोन तयार करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार सध्या दोन मैदाने प्रशासनाने ताब्यात घेवून त्याठिकाणी नागरिकांसाठी भाजी विक्री करण्यात येणार आहे. परिणामी संबंधित परिसरातील नागरिकांची गैरसोय दूर झाली आहे. प्रशासन नागरिकांच्या हितासाठी उत्कृष्ट निर्णय घेत असून नागरिकांसाठी आणखी काही ठिकाणी, तसेच मोकळ्या मैदानावर भाज्या, फळे विक्री सुविधा उपलब्ध करून देण्याच्या विचारात आहे. लॉकडाऊनच्या काळात जनतेसाठी प्रशासनाने तत्परता दाखविली आहे.